साताऱ्यातील त्रिशंकू भागात नागरी सुविधांचा अभाव; विकासकामांसाठी नगराध्यक्षांना साकडे

दिलीपकुमार चिंचकर | Sunday, 15 November 2020

विसावा पार्क आतापर्यंत त्रिशंकू भागात असल्यामुळे येथे नागरी सुविधांचा कायम अभाव आहे. आता या भागाचा समावेश सातारा पालिकेमध्ये झाला आहे. त्यामुळे विसावा पार्कमधील नागरी सुविधा देणे पालिकेचे कर्तव्य असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

सातारा : विसावा पार्कमध्ये तातडीने नागरी सुविधा द्याव्यात, अशा मागणीचे निवेदन विसावा पार्कमधील नागरिकांनी नुकतेच नगराध्यक्षा माधवी कदम यांना दिले. विसावा पार्क आतापर्यंत त्रिशंकू भागात असल्यामुळे येथे नागरी सुविधांचा कायम अभाव आहे. 

आता या भागाचा समावेश सातारा पालिकेमध्ये झाला आहे. त्यामुळे विसावा पार्कमधील नागरी सुविधा देणे पालिकेचे कर्तव्य आहे. दररोज रस्त्यांची झाडलोट करून जागोजागी असलेले कचऱ्याची कोंडाळी साफ करावीत, रस्त्याचे डांबरीकरण करणे, काही रस्त्याचे पॅचवर्क करावे, रस्त्यावर झालेली अतिक्रमणे काढावीत, विजेच्या खांबावर स्ट्रीट लाईट लावावेत. 

दिवाळीतही आशा, गटप्रवर्तकांच्या पदरी निराशा; वाढीव मानधन कागदावरच

सध्या प्राधिकरणकडून पाणीपुरवठा होतो; पण कमी वेळ पाणी सोडले जाते तरी अजून जास्त एक तास पाणीपुरवठा वाढवून मिळावा. विसावा पार्कमध्ये दोन ओपन स्पेस असून, त्यामध्ये नाना- नानी पार्क, ओपन जिम, लहान मुलांसाठी बागेतील खेळणी, बगीचा थिम पार्क, ज्येष्ठ नागरिकांसाठी करमणूक हॉल अशा सुविधा तातडीने द्याव्यात, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना राजेंद्र रानडे यांच्यासह विसावा पार्कमधील मान्यवर उपस्थित होते. स्वच्छता या विषयावर लवकर काम केले जाईल, असे आश्वासन नगराध्यक्ष कदम यांनी दिले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे