कऱ्हाडला आणखी 200 बेड वाढवा; जिल्हाधिकाऱ्यांचे 'कृष्णा'ला आवाहन

कोरोनाबाधितांची संख्या दररोज मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. पहिल्यापेक्षा जादा वेगाने याचा प्रसार होत आहे.
Karad Hospital
Karad Hospitalesakal

कऱ्हाड (सातारा) : कोरोनाबाधितांना कऱ्हाडमध्ये तत्काळ बेड उपलब्ध व्हावेत, या अनुषंगाने नुकतीच जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी स्वतः कृष्णा हॉस्पिटल प्रशासनाशी थेट भेटून चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी आणखी 200 बेड वाढवण्याचे आवाहन कृष्णा हॉस्पिटलच्या प्रशासनाला केले आहे.

कोरोनाबाधितांची संख्या दररोज मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. पहिल्यापेक्षा जादा वेगाने याचा प्रसार होत आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. सर्वसामान्य लोक रुग्णाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तेथे बेड शिल्लक नसल्याचे सांगितले जाते. एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलचे नाव सांगून तिकडे रुग्णाला पाठवले जाते. दरम्यानच्या काळात त्या रुग्णाचे मोठे हाल होतात. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यावर संबंधित रुग्णाची ऑक्‍सिजन लेव्हल कमी होते. त्यातच रुग्णाला गेल्या-गेल्या बेड मिळत नाही. त्याला या हॉस्पिटलमधून त्या हॉस्पिटलमध्ये फिरवावे लागते.

कऱ्हाड, मलकापूरमधील हॉस्पिटलमधील बेड फुल्ल असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सिंह यांनी आज तातडीने शासकीय विश्रामगृहात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीनंतर जिल्हाधिकारी यांनी थेट कृष्णा हॉस्पिटलला भेट दिली. हॉस्पिटल प्रशासनाला त्यांनी सध्या असलेल्या 400 बेड व्यतिरिक्त आणखी 200 बेड वाढवण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर शहरातील ज्या हॉस्पिटलमध्ये कोरोनासंदर्भातील उपचार मिळतील, ती सर्व हॉस्पिटल सुरू करण्याचेही आदेश दिले.

लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करा

ब्रेक द चेन अंतर्गत सुरू असलेल्या लॉकडाअन अनुषंगाने शासकीय विश्रामगृहात जिल्हाधिकारी सिंह यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. प्रांताधिकारी दिघे, पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, तहसीलदार वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, तालुका पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख आदी उपस्थित होते. बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाउनच्या नियमावलीची काटेकोरपणे अंमजबजावणी करण्यासह कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग वाढवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.

Edited By : Balkrishna Madhale

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com