esakal | भाजपने शेतकऱ्यांसह सामान्य जनतेला त्रासच दिला : विश्वजित कदम
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपने शेतकऱ्यांसह सामान्य जनतेला त्रासच दिला : विश्वजित कदम

पुणे पदवीधरमधून महाविकास आघाडीचे अरुण लाड व शिक्षकमधून जयंत आसगावकर चांगल्या मताधिक्‍याने निवडून येतील. त्याचबरोबर राज्यातील महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार मताधिक्‍याने जिंकतील, असाही विश्वास मंत्री विश्वजित कदम यांनी व्यक्त केला.

भाजपने शेतकऱ्यांसह सामान्य जनतेला त्रासच दिला : विश्वजित कदम

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड : महाविकास आघाडीचे तीन पक्षांचे सरकार एकदिलाने लोकांच्या सेवेसाठी काम करत आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी हे सरकार बांधिल आहे, असा विश्वास कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी व्यक्त केला. विरोधकांनी त्यांच्या पाच वर्षांत काय केले हे जनतेसमोर येऊन सांगावे. आम्ही एक वर्षात काय केले ते सांगायला तयार आहोत, असेही आव्हान त्यांनी भाजपला दिले.
 
कदम हे कऱ्हाड येथे आले हाेते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष इंद्रजित मोहिते, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, शिवराज मोरे उपस्थित होते. मंत्री कदम म्हणाले, ""महाविकास आघाडी सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले. हे तीन पक्षांचे सरकार भक्कम असून, एकदिलाने लोकांच्या सेवेसाठी काम करत आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी हे सरकार बांधिल आहे. सरकारने शेतकऱ्यांना एकोणीस हजार कोटींची कर्जमाफी दिली. कोरोनाच्या संकटामुळे सरकारचे उत्पन्न घटल्याने महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्याच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन सरकार काम करत आहे. अतिवृष्टीच्या कालावधीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाने दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. सरकार सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी बांधिल आहे. विरोधक मात्र टीकाटिप्पणी करत आहेत. त्यांनी त्यांच्या पाच वर्षांच्या कालावधीत काय केले हे जनतेसमोर येऊन सांगावे. त्यांनी त्यांचे सरकार असताना शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेला त्रास देण्याचे काम केले.''
 
केंद्र सरकारच्या भूमिकेबद्दल ते म्हणाले, ""केंद्र सरकार गुजरात, बिहारला मदत करत आहे. मात्र, महाराष्ट्राला दुजाभावाची वागणूक देत आहे. महाराष्ट्रातील विकासकामात अडथळे आणण्याचे काम सुरू आहे. केंद्राने महाराष्ट्रात सरकार कोणाचे आहे, हे न पाहता येथील जनतेसाठी मदतीचा हात पुढे करावा; परंतु तसे होताना दिसत नाही. केंद्राकडून महाराष्ट्राचे येणे असलेली जीएसटीची 18 हजार कोटींची बाकी देण्यात टाळाटाळ केली जात आहे.'' वीजबिल माफीबाबत ते म्हणाले, ""कोरोनाच्या संकटामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संकटातून बाहेर पडल्यानंतर हळूहळू त्याबाबतची मदत केली जाईल.'' 

लोकसेवेच्या संधीचे सोने करीन : ललिता बाबर

महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यामुळे पुणे पदवीधरमधून महाविकास आघाडीचे अरुण लाड व शिक्षकमधून जयंत आसगावकर चांगल्या मताधिक्‍याने निवडून येतील. त्याचबरोबर राज्यातील महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार मताधिक्‍याने जिंकतील, असाही विश्वास मंत्री कदम यांनी व्यक्त केला.

Edited By : Siddharth Latkar

loading image