काय सांगता! सातारा ते कागल महामार्गावर बनणार सर्वाधिक लांबीचा उड्डाण पूल

सचिन शिंदे | Wednesday, 6 January 2021

प्रत्यक्ष भेटीनंतर आमदार चव्हाण यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. महामार्ग अधिकाऱ्यांनी कोल्हापूर नाका येथे उभारण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाचा आराखडा त्यांना दाखविला.

कऱ्हाड : पुणे- बंगळूर महामार्गाच्या येथील कोल्हापूर नाक्‍यावर वाहनांची वाढती गर्दी, होणारे अपघात टाळण्यासाठी उड्डाण पुलाची उभारणी करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारकडे पाठपुराव करणाऱ्या माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतीच प्रत्यक्ष महामार्गावरील कोल्हापूर नाका येथे जाऊन परिस्थितीची पाहणी केली.  कोल्हापूर नाका येथे नवीन उड्डाण पूल व्हावा, यासाठी आमदार चव्हाण यांनी केंद्रीय पातळीवर प्रयत्न करत आहेत, त्यादृष्टीने त्यांची प्रत्यक्ष भेट महत्त्वाची ठरली. त्यांच्यासोबत प्रांताधिकारी उत्तम दिघे, पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, महामार्गचे अधिकारी वसंत पंधरकर, पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, वाहतूक शाखेच्या सरोजिनी पाटील, मलकापूरचे उपाध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजित चव्हाण, राहुल चव्हाण उपस्थित होते. 

प्रत्यक्ष भेटीनंतर आमदार चव्हाण यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. महामार्ग अधिकाऱ्यांनी कोल्हापूर नाका येथे उभारण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाचा आराखडा त्यांना दाखविला. उड्डाण पूल साडेतीन किलोमीटरचा असून, तो सातारा ते कागल महामार्गावरील सर्वाधिक लांबीचा आहे, असे या वेळी स्पष्ट करण्यात आले. श्री. पंधरकर म्हणाले, ""हा पूल सिंगल पिलर रचनेवर आहे. पूल वाहतुकीसाठी सहापदरी असेल. उड्डाण पुलाखालील सेवा रस्ता चौपदरी आहे. नव्या कोयना पुलापासूनच्या सुरू होणार उड्डाण पूल हॉटेल पंकज ते नांदलापुरात एनपी मोटर्सपर्यंत आहे. त्यामुळे शहरासह मलकापुरातील वाहतूक नियंत्रण करता येईल.'' 

पुणे - बंगळूर महामार्गावर बिबट्याचे ठाण; अर्धा तास खाेळंबली वाहतुक 

Advertising
Advertising

आमदार चव्हाण म्हणाले, ""कोल्हापूर नाका येथील वाढते अपघात व वाहतूक कोंडीवर नवीन उड्डाणपूल होईपर्यंत तत्काळ पर्यायी वाहतूक व्यवस्था करावी. त्याचा आराखडा तयार करावा. सर्व विभागांची पुढील दहा दिवसांत पुन्हा एकदा बैठक घेऊन पर्यायी व्यवस्थेचा निर्णय घेतला जाईल.''

 

नवीन उड्डाण पुलाबाबत केंद्रीय मंत्री व सचिवांसोबत बैठक घेऊन पाठपुरावा सुरू आहे. कऱ्हाडातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा नवीन पूल लवकरात लवकर व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री

Edited By : Siddharth Latkar