संसर्गाच्या काळात पैशापैक्षा माणुसकी ठरतीय श्रेष्ठ : डॉ. प्रवीण चव्हाण
कोरोना संसर्गाच्या काळात पैशांपैक्षा आपण कमवलेल्या माणसांचाच मोठा आधार मिळाला. जीवन सकारात्मक पद्धतीने जगण्याचा संदेश मिळाला. या खडतर काळात आपण माणसांचा द्वेष न करता कोरोनाचा द्वेष केला पाहिजे, एकमेकांना मदतीची भावना कायम ठेवली पाहिजे, ही अनुभूती मिळाली, असे डॉ. प्रवीण चव्हाण यांनी सांगितले.
वडूज (जि. सातारा) : वैद्यकीय व्यवसायाच्या माध्यमातून रुग्णसेवा व प्रयास सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून समाजसेवेचे काम करत आहे. सोनोग्राफीचा व्यवसाय असल्यामुळे रुग्णांशी संपर्क येतो. सॅनिटायझर, मास्कचा वापर, तसेच तपासणीसाठी आलेल्या रुग्णांची ऑक्सिजन व तापमानाची तपासणी, सामाजिक अंतर आदी सर्व त्या दक्षता घेतल्या. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाबाधित रुग्णाचा संपर्क आला होता. त्यावेळी स्वत:ची चाचणी निगेटिव्ह आली. मात्र, सात दिवस क्वारंटाइन राहावे लागले होते. नंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला थोडासा ताप, घसा खवखवणे, अंगदुखी असा त्रास जाणवू लागल्याने चाचणी केली तेव्हा आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले. त्यानंतर स्वत: तसेच पत्नी व दोन मुले असे घरामध्ये स्वतंत्र खोल्यांमध्ये होम क्वारंटाइन झालो. आपल्याबरोबरच कुटुंबीयांनाही सर्व ती काळजी घेण्यास सांगितले.
होम क्वारंटाइन झाल्यानंतर औषधोपचार सुरू केले. वडूजमध्येही काही डॉक्टरांसह रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता वाटत होती. आता घाबरायचे नाही, कोरोनाशी लढा देतच यशस्वी व्हायचे, असा ठाम निश्चय केला. डॉ. बी. जे. काटकर, डॉ. सचिन साळुंखे (सातारा) तसेच अन्य डॉक्टर मित्रांनी मोलाचे सहकार्य केले. पहिल्यापासून धावणे, योगा, प्राणायाम आदी व्यायामांची आवड असल्याने अन्य काही आजार नव्हते. आपण घरात राहून योग्य ती काळजी घेऊन सकारात्मक विचार ठेवून निश्चित बरे होऊ शकतो, असा आत्मविश्वास निर्माण झाला. याकाळात मोबाईल, पुस्तकेच सोबती होती. शिवाय छायाचित्रणाची आवड असल्यामुळे अनेक जुनी छायाचित्रे पुन्हा पुन्हा पाहण्यात मन रमविले. होम क्वारंटाइनच्या काळात अनेक मित्र तसेच रुग्णमित्रांचे फोन येत होते, माझ्या तब्येतीची विचारपूस करीत होते. त्यांची विचारपूसच मला मोठा धीर देत होती. पैशांपैक्षा आपण कमवलेल्या माणसांचाच मोठा आधार मिळत होता.
मानसिकता सकारात्मक हवी, कोरोना तुमचे काहाही बिघडवू शकत नाही : किरण इनामदार
मला मानसिक सक्षमीकरणासाठी ताकद मिळत होती. त्यामुळे स्वत:च्या कुटुंबीयांनाही धीर दिला. योग्य तो आहार, उपचार, दक्षता घेतल्यास कोरोनावर आपण निश्चित मात करू शकतो, याचा स्वानुभव आला. त्यामुळे फोनवरून मित्रांनाही धीर देण्याचा प्रयत्न केला. जीवन सकारात्मक पद्धतीने जगण्याचा संदेश कोरोनाने दिला असे वाटते. या खडतर काळात आपण माणसांचा द्वेष न करता कोरोनाचा द्वेष केला पाहिजे, एकमेकांना मदतीची भावना कायम ठेवली पाहिजे. वडूजमध्ये कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय झाला. त्यामध्ये वडूज मेडिकल असोसिएशनने योगदान देण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी डॉ. इनामदार यांचा कोविड सेंटरला मदत करण्याबाबत फोन आला. त्यावेळी मी स्वत: होम क्वारंटाइन असतानासुद्धा कोविड सेंटरला मदत करता आली, याचे मनस्वी समाधान वाटते.
संपादन : बाळकृष्ण मधाळे