सकारात्मक ऊर्जा, आईची आठवणीतून कोरोनावर सहज मात : डाॅ. प्रकाश कदम

यशवंतदत्त बेंद्रे | Tuesday, 13 October 2020

सकारात्मक विचारांच्या जोरावर वैद्यकीय उपचारांवर बरा झालो. योग्य आहार, योगासने व उपचार याद्वारे कोरोनावर मात करता येते, याचा अनुभव घेतला. 25 दिवसांनंतर पुन्हा तारळे पीएचसीत हजर राहून रुग्णसेवेला सुरवात केल्याचे डाॅ. प्रकाश कदम यांनी नमूद केले.

तारळे (जि. सातारा) : वैद्यकीय सेवेत असूनही कोरोनाची लागण झाली. माझ्याबरोबर संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित झाले. वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत असूनही मन मात्र चिंतेत होते. मात्र, मित्रांनी दिलेला आधार सामान्यांच्या सदिच्छांच्या जोरावर कोरोनावर मात केली. प्रतिकूल परिस्थितीत आत्मविश्वास ढळू दिला नाही. 52 वर्षीय डाॅ. प्रकाश कदम हे तारळ्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून गेली सात वर्षे कार्यरत आहेत. काेराेनावर केलेली मात आणि त्यानंतर घ्यावयाची काळजी याबाबत डाॅ. प्रकाश कदम भरभरुन बाेलत हाेते.

ते म्हणाले, रुग्णसेवेचे ब्रीद घेऊनच विभागातील डोंगरकपारीत वसलेल्या जनतेच्या सेवेत मी आहे. अडल्या नाडलेल्या रुग्णांना प्रसंगी हरतऱ्हेची मदत केली. त्याचेच फळ प्रतिकूल परिस्थितीत मिळाले असे मला वाटते. लाॅकडाउनच्या काळात लपून येणारे व मे महिन्यात बंदी उठल्यानंतर बाहेर जिल्ह्यातून खासकरून पुणे, मुंबईवरून येणाऱ्या नागरिकांवर विशेष लक्ष ठेवले होते. कर्मचाऱ्यांमार्फत त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली. त्यामुळे सुमारे चार महिने तारळे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कोरोनाला दूर ठेवले. मात्र, 15 जुलैपासून बाधित रुग्ण सापडायला सुरुवात झाली. खासगी दवाखाने रुग्णांना तपासण्यास कचरत होते. त्यावेळी तारळे प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णांसाठी हक्काचे झाले होते. त्याच काळात बाधित रुग्णांशी अनेकदा संपर्क येत होता. त्यामुळे मी टेस्ट करून घेतली. पहिल्यांदा ती निगेटिव्ह आली. मात्र, 23 ऑगस्टला पत्नी पॉझिटिव्ह आली. त्या पाठोपाठ मुलगा, मुलगीही पॉझिटिव्ह आली. मग माझीही पुन्हा टेस्ट केली. त्यावेळी ती पॉझिटिव्ह आली.

कोयना धरणातून सकाळी नऊला पाणी साेडणार : कुमार पाटील

घरातील सर्वांना धीर दिला. सर्वांना सकारात्मक विचार करण्याची गरज सांगितली. माझी बायपास सर्जरी झाली आहे. पाय फ्रॅक्‍चर व उच्च रक्तदाब असल्याने पहिल्यांदा मन घाबरले. मात्र, मित्रमंडळींकडून सकारात्मक ऊर्जा मिळाली. माझ्यासह कुटुंबीयांनाही त्यांनी धीर दिला. रुग्णालयात असताना 14 दिवस वाचनात मन गुंतविले.

कामात कुचराई; नऊ वॉर्डबॉय थेट घरी, बीड सीएसची कारवाई! 

विशेषतः आईची आठवण झाली. तिच्यावर नव्याने कविता लिहिल्या. कोरोनाचा नेमका रुग्णांवर काय परिणाम होतो, त्यास काय द्यावे, याबद्दल ज्ञानात भर पडली. कृष्णा हॉस्पिटलमध्ये डॉक्‍टर, नर्स यांनी सेवा दिली. कोरोनावर मात करणारच असा विश्वास होताच, तो सिद्ध केला. सकारात्मक विचारांच्या जोरावर वैद्यकीय उपचारांवर बरा झालो. योग्य आहार, योगासने व उपचार याद्वारे कोरोनावर मात करता येते, याचा अनुभव घेतला. 25 दिवसांनंतर पुन्हा तारळे पीएचसीत हजर राहून रुग्णसेवेला सुरवात केली.

Edited By : Siddharth Latkar