फलटणकरांना कोरोनाची धास्ती; उपजिल्हा रुग्णालय सज्ज करण्याचा आग्रह

Satara
Satara

फलटण (जि. सातारा) ः शहर व तालुक्‍यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मर्यादित आहे. तथापि पुणे, मुंबई व अन्य शहरी भागांतून मोठ्या संख्येने दाखल झालेल्या, होत असलेल्या आपल्याच लोकांमुळे आता इतर तालुक्‍यांप्रमाणे येथेही रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. या पार्श्‍वभूमीवर भविष्यात वाढणाऱ्या संभाव्य रुग्णसंख्येचा विचार करून उपजिल्हा रुग्णालय कोरोनावर उपचार करण्यासाठी सज्ज ठेवण्याची गरज सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. 

फलटण शहर आणि तालुक्‍यातील रहिवाशी आजवर अन्य आजारांबाबत पुणे शहराला जवळ करत असत. अलीकडे लोकवस्ती वाढत असताना शहरात काही मोजकी हॉस्पिटल्स उभी राहिल्याने पुणे जवळ करणे कमी झाले असले तरी अद्याप पुण्याहून येणाऱ्या तज्ज्ञ डॉक्‍टरांचा राबता येथे सुरू आहे. आज कोरोनाशिवाय अन्य आजारांचे रुग्ण येथे मोठ्या संख्येने असूनही येथील उपलब्ध हॉस्पिटल्स पुरेशी दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर येथील खासगी हॉस्पिटल्स कोरोना उपचारासाठी पुढे आली तर अन्य आजारांच्या रुग्णांबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होण्याचा धोका आहे. खासगी रुग्णालयांत गंभीर आजाराची रुग्णसंख्या मोठी असल्यामुळे त्यांना सरळ वाऱ्यावर सोडून समाजकार्यासाठी येथील काही डॉक्‍टर मंडळी आपली रुग्णालये कोरोना उपचारासाठी उपलब्ध करून देण्यास किंवा काही डॉक्‍टर्स स्वतःची सेवा देण्याच्या विचारात असल्याचे समजते. या पार्श्‍वभूमीवर उपजिल्हा रुग्णालय सक्षमपणे उभे करून तेथे कोरोना रुग्णांसाठी सर्व उपचाराची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे. 

शासनाने सातारा जिल्ह्यात अन्य तालुक्‍यांतील शासकीय रुग्णालये ज्याप्रमाणे कोरोना उपचारासाठी सर्व साधने, सुविधा उपलब्ध करून देऊन सज्ज केली आहेत, त्याप्रमाणे येथील उपजिल्हा रुग्णालय सर्व साधने, सुविधांनी सुसज्ज करावे. गरज वाटल्यास येथील खासगी डॉक्‍टरांना उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी पाचारण करून त्यांना समाजसेवेची संधी द्यावी, तसे करताना नियमानुसार त्यांनाही काही कालावधीची ड्युटी केल्यानंतर होम क्वारंटाइन आणि नंतरच स्वतःचे हॉस्पिटल पाहण्याची मुभा देता येईल, याचाही विचार करावा लागेल. 

आतापर्यंत मालोजीराजे शेती विद्यालयाच्या कॉम्प्लेक्‍समध्ये केवळ कोरोना संशयित रुग्ण ठेवले जात होते. आता पॉझिटिव्ह रिपोर्ट आहे. परंतु लक्षणे नाहीत, असे काही रुग्ण येथे दाखल केले जात आहेत. या रुग्णसंख्येत वाढ झाल्यास तातडीने उपचारासाठी येथे सुविधा उपलब्ध नसल्याने तातडीने खासगी रुग्णालय जवळ केले गेले तर तेथील अन्य रुग्णांची गैरसोय होण्याचा धोका असल्याने सर्व दृष्टीने उपजिल्हा रुग्णालय कोरोना उपचारासाठी सक्षम करणे, हा निर्णय उपयुक्त ठरेल. लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासनाने त्यादृष्टीने विचार करून त्वरित निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

जिल्हा मुख्यालयापासून फलटण दूर 

सातारा जिल्ह्यातील अन्य तालुक्‍यांच्या तुलनेमध्ये फलटण तालुका हा जिल्हा मुख्यालयापासून काहीसा दूर आणि जिल्हास्तरावरील रुग्णालयांपर्यंत तातडीने पोचता येण्यासारखा नसल्यामुळे येथे कोरोना उपचारासाठी सक्षम यंत्रणा उभारण्याची नितांत आवश्‍यकता आहे. त्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाचा 
विचार झाला पाहिजे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com