सज्जनगडावरील मालमत्ता संस्थानला द्या,समर्थ सेवा मंडळाने देणग्यांचा तपशील द्यावा; न्यायालयाचा आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सज्जनगडावरील मालमत्ता संस्थानला द्या,समर्थ सेवा मंडळाने देणग्यांचा तपशील द्यावा; न्यायालयाचा आदेश

दरम्यान, या निर्णयाच्या विरोधात अपिल करणार असल्याबाबत अर्ज न्यायालयात दाखल केला असून, अपिल कालावधीपर्यंत हुकूमनाम्याच्या अंमलबजावणीस न्यायलयाने स्थगिती दिली आहे.

सज्जनगडावरील मालमत्ता संस्थानला द्या,समर्थ सेवा मंडळाने देणग्यांचा तपशील द्यावा; न्यायालयाचा आदेश

सातारा : सज्जनगड येथील रामदास स्वामी संस्थान आणि समर्थ सेवा मंडळाच्या दाव्याचा न्यायालयात नुकताच निकाल लागला आहे. सज्जनगडावर जमविलेली सर्व स्थावर मालमत्ता समर्थ सेवा मंडळाने संस्थानच्या ताब्यात द्यावी, आदेश येथील न्यायालयाने निकालात दिला आहे.
 
सेवा मंडळाने संस्थानचे प्रतिनिधी म्हणून निधी गोळा करून संस्थानच्या सज्जनगड येथील मिळकतीमध्ये इमारती बांधून स्वतःचा मालकी हक्क निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. सज्जनगड देवस्थान संस्थानच्या मालकी हक्कातील असताना स्वतःची समांतर व्यवस्था निर्माण करून देणग्या गोळा केल्या. संस्थानचे प्रतिनिधी म्हणून काम करायचे असताना गैरफायदा करून घेतल्याने प्रतिनिधीपद रद्द करावे व मिळकतीचा कब्जा, हिशोब, रकमा व ताकीद मागणीसाठी श्री रामदास स्वामी संस्थानच्या वतीने विश्‍वस्त सु. ग. स्वामी आणि इतरांनी श्री समर्थ सेवा मंडळ आणि त्यांचे मार्गदर्शक, विश्‍वस्त यांच्या विरोधात 2003 मध्ये दावा दाखल केला होता. या दाव्याचा निकाल नुकताच लागला आहे.

बहरणा-या पर्यटनासाठी महाबळेश्वर पालिका सज्ज : पल्लवी पाटील

त्यानुसार श्री समर्थ सेवा मंडळाने व इतर प्रतिवादींनी श्री रामदास स्वामी संस्थानच्या दाव्यातील सज्जनगडावरील सर्व मालमत्ता संस्थानच्या ताब्यात द्याव्यात. श्री समर्थ सेवा मंडळ व इतर प्रतिवादींनी 1959 पासून मिळविलेल्या देणग्या, बांधलेल्या स्थावर मालमत्ता आणि व्याज याचा तपशील संस्थानला द्यावा. सेवा मंडळ व इतर प्रतिवादींनी सज्जनगडावरील श्री रामदास स्वामी संस्थान आणि सज्जनगडावरील देवस्थान यांच्या जागेत पूजा, उत्सव, यात्रा, नैवेद्यासाठी जमा केलेला निधी व देणग्या व त्यावरील व्याजाचा तपशील संस्थानला द्यावा. याप्रमाणे देय असलेल्या रकमा ताबडतोब संस्थानला वर्ग करण्याची जबाबदारी वैयक्तिक व सामूहिकरीत्या सेवा मंडळ व इतर प्रतिवादींची आहे.

समर्थांच्या किष्किंधाकांडाचे मुद्रणास साताऱ्यात प्रारंभ 

संबंधित रकमांचा हिशोब दिला नाही, तर त्यासाठी कोर्ट कमिशन नेमण्यात यावे आणि त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करावा. फिर्यादींनी नमूद केलेली रक्कम तीन कोटी 25 लाख व 50 लाख रुपये दाव्यात अंतिम हुकूमनामा होईपर्यंत काढून घेऊ नये आणि हस्तांतरही करू नये. श्री समर्थ सेवा मंडळाने स्वतः त्यांचे नोकर आणि इतर कोणत्याही व्यक्तींमार्फत श्री रामदास स्वामी संस्थानचे प्रतिनिधी म्हणून निधी संकलन करू नये, असे न्यायालयाने निकालात म्हटले आहे. संस्थानच्या वतीने ऍड. श्‍यामप्रसाद बेगमपुरे यांनी काम पाहिले.
 
दरम्यान, या निर्णयाच्या विरोधात अपिल करणार असल्याबाबत अर्ज न्यायालयात दाखल केला असून, अपिल कालावधीपर्यंत हुकूमनाम्याच्या अंमलबजावणीस न्यायलयाने स्थगिती दिली आहे.

चारुदत्त आफळेंना सातारा भूषण पुरस्कार जाहीर

Edited By : Siddharth Latkar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Satara
loading image
go to top