esakal | कोरोनाची करुण कहाणी; आता कशी करेल, गणराया त्यांचे साकडे पुरे?
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाची करुण कहाणी; आता कशी करेल, गणराया त्यांचे साकडे पुरे?

दररोज घरातील सर्वजण एकत्र येऊन आरती व पूजा करीत आहेत. त्यांची ही आळवणी व भक्तिभाव पाहून अनेकांचे हृदय पिळवटून जात आहे.

कोरोनाची करुण कहाणी; आता कशी करेल, गणराया त्यांचे साकडे पुरे?

sakal_logo
By
विलास साळूंखे

भुईंज (जि.सातारा) : जगभरातील कोरोना कहाण्या हादरवून टाकणाऱ्या आहेत. असे असले तरी किमान लस येईपर्यंत कोरोनासोबत जगायला शिकायला हवे, असा सल्ला तज्ज्ञ मंडळी देत आहेत. पण, ते सर्वसामान्यांसाठी तितके सोपे आहे का, असा सवाल मनात आणणाऱ्या घटना आता अगदी आपल्या अवतीभवती घडायला लागल्या आहेत. या परिसरातील एका गावात कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तीची दुःखद बातमी अद्याप त्याच्या जवळच्या प्रियजनांना देण्यात आलेली नाही.

त्यांच्या घरी स्थापन केलेल्या गणरायाची मनोभावे पूजा-अर्चा सुरू आहे. घरच्या त्या व्यक्तीला बरं कर, असे साकडे रोज गणरायाला घातले जात आहे. त्यांची ही आळवणी निष्फळ ठरली आहे. मात्र, त्याची कल्पना द्यायची कशी, या प्रश्‍नाने सर्व जण व समाजमन सुन्न झाले आहे.

साता-यात अजब कारभार, पालिकेच्या तिजोरीवर हायड्रोलिक क्रेनचा भार!
 
कोरोनाच्या बाधेमुळे संबंधित व्यक्तीला उपचारासाठी गणेश आगमनानंतर दाखल केले होते. आपली व्यक्ती बरी होऊन येईल, असा विश्‍वास कुटुंबीयांना आहे. त्यातच गणेशोत्सवात घरी स्थापन केलेल्या गणरायाची मनोभावे पूजा देखील सुरू आहे. मात्र, पाच दिवसांपूर्वी त्या व्यक्तीचे निधन झाले. मृतदेहावर नियमानुसार अंत्यसंस्कार झाले. त्याची माहिती संबंधित मृत व्यक्तीच्या भावालाही कळविण्यात आली. मात्र, या घटनेची माहिती घरी द्यायची कशी, असा प्रश्‍न बिचाऱ्या भावाला पडला आहे.

साताऱ्यात फक्त हॉटेल, लॉजिंग सुरू करण्यास मान्यता; वाचा नवा आदेश

भावाने मृत व्यक्तीचे तिसऱ्या दिवशीचे कार्यही परस्पर केलेले आहे. मात्र, ही वाईट बातमी सांगण्याचे धाडस ना त्याला झाले, ना नातेवाईकांना झाले. गावातील प्रमुखांनाही तोच प्रश्‍न पडला आहे. ते सांगण्याचे बळ, धाडस कोणी एकवटू शकले नाही. त्यामुळे संबंधित व्यक्तीचे कुटुंबिय आपला माणूस बरा होऊनच घरी येईल, या दृढ आशेवर आहेत. त्या आशेतूनच गणरायाची भक्ती मनोभावे सुरू आहे. दररोज घरातील सर्वजण एकत्र येऊन आरती व पूजा करीत आहेत. त्यांची ही आळवणी व भक्तिभाव पाहून अनेकांचे हृदय पिळवटून जात आहे. घरातील मृत व्यक्तीचे शेवटचे दर्शन नाही, एवढंच काय पण त्याची साधी माहिती देखील नाही. कोरोना आणखी काय काय पाहायला लावणार, या प्रश्‍नाने समाजमन अस्वस्थ झाले आहे. 
 
Edited By : Siddharth Latkar

( या बातमीतून अंधश्रद्धेचा प्रचार व प्रसार करण्याचा काेणता हेतुही नाही)

loading image
go to top