शिक्षक आमदारकीसाठी डीएड शिक्षक संघटनेने ठोकला शड्डू

शिक्षक आमदारकीसाठी डीएड शिक्षक संघटनेने ठोकला शड्डू

मायणी (जि. सातारा) : शिक्षक आमदारकीसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणीस जोरदार सुरुवात केली असून, यंदा प्रथमच डीएड शिक्षक संघटनेने सवता सुभा मांडत शड्डू ठोकला आहे. कोरोनामुळे व्हॉट्‌सऍप, फेसबुक, मेसेज, व्हिडिओ कॉन्फरन्स आदी माध्यमांद्वारे मतदारांशी संपर्क साधला जात आहे.
 
पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणारे आमदार दत्तात्रय सावंत यांचा कार्यकाल जुलैअखेर संपुष्टात आला. कोरोनामुळे सर्वच निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. त्यामध्ये शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिसूचनाही लांबणीवर पडली होती. मात्र, आयोगाने नुकतीच निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत घोषणा केली. त्यानुसार एक डिसेंबरला मतदान होणार आहे. पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ विस्ताराने मोठा असल्याने प्रत्येक मतदारापर्यंत पोचणे शक्‍य नसते. त्यामुळे अनेक उमेदवार शिक्षक, मुख्याध्यापक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षण संस्थाचालक यांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रचारासाठी शिक्षक कार्यकर्ते प्रत्येक शाळेपर्यंत पोचत असत.

राज्यातील 43 हजार शिक्षकांचा निर्धार; अगोदर अनुदान, मगच मतदान 

यंदा कोरोनामुळे शाळा बंद असून, अत्यावश्‍यक काम असेल, तरच शिक्षक शाळेत येत आहेत. परिणामी शिक्षकांशी थेट संपर्क साधणे, गाठीभेटी घेणे अशक्‍य होत आहे. म्हणूनच व्हॉट्‌सऍप, फेसबुक, टेक्‍स्ट मेसेज, व्हिडिओ कॉन्फरन्स आदी माध्यमांद्वारे मतदारांशी संपर्क साधण्याचे आव्हान उमेदवारांना पेलावे लागत आहे. मतदार नोंदणीसाठी प्रयत्नांची शिकस्त करण्यात येत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार दत्तात्रय सावंत यांनी मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अशा विविध घटकांना तालुकास्तरावर आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे शिक्षक आमदारकीची निवडणूक चर्चेत येऊ लागली आहे.

 "गाय म्हणजे माता आणि पलिकडे जाऊन खाता" हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी घेतली शाळा

दरम्यान, 2014 च्या निवडणुकीत तत्कालीन आमदार भगवानराव साळुंखे, दत्तात्रय सावंत, डॉ. मोहन राजमाने, दशरथ सगरे, सुभाष माने यांच्यात चुरस निर्माण झाली होती. त्यामध्ये दत्तात्रय सावंत विजयी झाले. गेल्या सहा वर्षांत बरेच पाणी पुलाखालून गेले. माध्यमिक शाळांतील डीएड पदवीधर शिक्षकांवर सेवा ज्येष्ठतेमध्ये 40 वर्षांपासून अन्याय झाल्याची खदखद वाढली आहे. परिणामी, यंदा प्रथमच शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीत डीएड शिक्षक संघटनांनी उडी घेतली आहे. संघटनेतील डीएड, कला व क्रीडाशिक्षकांचे मतदान निर्णायक ठरणार आहे. मात्र, विजयासाठी राजकीय पक्षांची मदत मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाचा प्रश्‍न, जुनी पेन्शन योजना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध, नवीन शैक्षणिक धोरण आदी प्रश्न आजही "आ'वासून उभे आहेत.
 
दरम्यान, शिक्षक परिषदेकडून माजी आमदार भगवानराव साळुंखे व जितेंद्र पवार इच्छुक आहेत. सलग दोनदा संधी देऊनही पराभूत झालेल्या डॉ. मोहन राजमानेंची तयारी दिसत नसल्याने माजी प्राचार्य बुरुंगले यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील शिक्षिका रेखा दिनकर पाटील यांनी पदर खोचला आहे. टीडीएफ संघटनेच्या माध्यमातून जे. के. थोरात नशीब अजमावणार आहेत. डीएड पदवीधर, कला, क्रीडा, शिक्षक- शिक्षकेतर महासंघामार्फत महादेव माने, महाराष्ट्र माध्यमिक डीएड शिक्षक महासंघातून नंदकिशोर गायकवाड, राज्य पुरोगामी शिक्षक फाउंडेशनचे बाळासाहेब गोतारणे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. निवडणूक जाहीर झाल्याने उमेदवारांच्या संख्येत भर पडण्याची शक्‍यता आहे. 

आरक्षणासाठी शरद पवारांनी पुढाकार घ्यावा, महिन्यात प्रश्न सुटेल; साता-यातील गोलमेज परिषदेत दावा 

नव्या चेहऱ्याची परंपरा 

पुणे मतदारसंघात मुकुंदराव कुलकर्णी, सुरेश पाटील यांचा अपवाद वगळता शिक्षक मतदारांनी प्रत्येक वेळी नवीन आमदार निवडून दिल्याची परंपरा आहे. सन 2002 मध्ये गजेंद्र ऐनापुरे, 2008 मध्ये भगवानराव साळुंखे, 2014 मध्ये दत्तात्रय सावंत यांनी विजय मिळवला. त्यामुळे आगामी निवडणुकीत मतदार नव्या चेहऱ्याला पसंती देणार, की विद्यमान आमदार सावंत परंपरा मोडीत काढणार हे येणारा काळच ठरवेल.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com