नवरात्राेत्सव रद्द करुन 'धर्मवीर'चा कोरोनाबाधितांसाठी झटण्याचा निर्णय

दिलीपकुमार चिंचकर | Wednesday, 23 September 2020

सातारा जिल्ह्यात प्लाझ्मा दान करण्यासाठी काेविडमधून बरे झालेल्या रुग्णांनी पुढाकार घ्यावा. त्यासाठी धर्मवीर संभाजीराजे जिमखान्यातर्फे आवश्यक ते सहकार्य केले जाईल अशी माहिती अध्यक्ष नगरसेवक अमाेल माेहिते यांनी दिली.

सातारा : कोरोना विषाणूच्या प्रसार वाढू नये तसेच वेळेतच विषाणू राेखला जावा यासाठी राजमाची येथील धर्मवीर संभाजीराजे जिमखान्याने यंदा नवरात्राेत्सव साजरा करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. याबराेबरच कोरोनाबाधितांकरिता आवश्‍यक उपचार, साहित्य पुरवण्यावर भर देणार असल्याची माहिती जिमखानाचे अध्यक्ष नगरसेवक अमोल मोहिते यांनी दिली. सध्या जिमखानाच्यावतीने ऑक्‍सिजन मशिन, ऑक्‍सिमीटर, सॅनिटायझर आदी वस्तू गरजूंना दिल्या जात असल्याचे माेहितेंनी नमूद केले.

धर्मवीर संभाजीराजे जिमखान्याच्या वतीने नवरात्राेत्सव खूप मोठ्या प्रमाणात, भक्तिभावात जोशपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. या नऊ दिवसांत मंडळातर्फे दरवर्षी विविध धार्मिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नवमीच्या महाप्रसादाला सातारा शहराच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. त्यामुळे या नऊ दिवसांत दुर्गा भक्तांची मंडळाच्या परिसरात भाविकांची माेठी गर्दी असते. परंतु, यावर्षी आलेले कोरोना महामारीचे संकट आणि सध्या सातारा शहर व परिसरामध्ये वाढती कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेऊन यावर्षी नवरात्राेत्सव साजरा न करण्याचा निर्णय जिमखान्याच्यावतीने घेण्यात आला आहे.

सेनेचे मंत्री म्हणाले, कितीही आदळाआपट करा सरकार पडणार नाही

याबाबत जिमखानाचे अध्यक्ष नगरसेवक मोहिते म्हणाले, धर्मवीर संभाजीराजे जिमखान्यातर्फे कोरोनाबाधितांकरिता आवश्‍यक उपचार व साहित्य पुरवण्यावर भर देणार आहाेत. सातारा जिल्ह्यात प्लाझ्मा दान करण्यासाठी काेविडमधून बरे झालेल्या रुग्णांनी पुढाकार घ्यावा. त्यासाठी जिमखान्यातर्फे आवश्यक ते सहकार्य केले जाईल.

Edited By : Siddharth Latkar