
Satara News : धीरेंद्र शास्त्री यांनी वारकरी संप्रदायाची मागितली माफी!
दहिवडी - धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या पुढाकाराने बागेश्वर धाम सरकार उर्फ पं. धीरेंद्र शास्त्री यांच्याकडून संत तुकाराम महाराजांबद्दल करण्यात आलेले वक्तव्य मागे घेण्यात आले असून, वारकरी संप्रदायाकडे क्षमा प्रार्थना केली आहे. सनातन धर्म व वारकरी संप्रदाय यांच्यात समन्वयाचे महत्त्वपूर्ण काम धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे (बाळासाहेबांची शिवसेना) अक्षयमहाराज भोसले यांनी केले आहे.
संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारत असे, म्हणून ते देवावर प्रेम करु लागले, असे वादग्रस्त विधान धर्मेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर महाराजांनी केली होते. यावरुन महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. या वक्तव्याचा अक्षयमहाराज भोसले यांनी चांगलाच समाचार घेतला होता. संत श्री तुकाराममहाराजांचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही, असा इशारा सुध्दा त्यांनी दिला होता. संतवर्य जिजाई आईसाहेबांबद्दल चुकीचे विधान महाराष्ट्र खपवून घेणार नाही. धीरेंद्र शास्त्रीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो असे सुध्दा अक्षयमहाराज भोसले म्हणाले होते.
काल अक्षयमहाराज यांनी थेट धीरेंद्र शास्त्री यांच्याशी संपर्क साधून याविषयी चर्चा केली होती. या चर्चेत एकमेकांची मते व भावना जाणून घेण्यात आल्या. त्यानंतर धीरेंद्र शास्त्री हे माफी मागतील असे अक्षयमहाराज भोसले म्हणाले होते. त्यानुसार आज धीरेंद्र शास्त्री यांनी संत तुकाराम महाराजांबद्दल चुकीचे बोलले गेलेले शब्द मागे घेवून संत तुकाराम महाराज मला गुरुस्थानी आहेत असे स्पष्ट केले.