एक जानेवारीपासून रेल्वे प्रवासास परवानगी देऊ; मंत्र्यांचे 'माथाडीं'ना आश्वासन

एक जानेवारीपासून रेल्वे प्रवासास परवानगी देऊ; मंत्र्यांचे 'माथाडीं'ना आश्वासन

ढेबेवाडी (जि. सातारा) : राज्य शासनाच्या कामगार, गृह, पणन व अन्य खात्यांकडे प्रलंबित असलेल्या माथाडी कामगारांच्या प्रश्नांची एक महिन्याच्या आत सोडवणूक करण्याच्या सूचना कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या. माथाडी कामगार जीवनावश्‍यक वस्तूंच्या मालाची चढ-उतार करत असल्याने एक जानेवारीपासून त्यांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्याचे आश्वासनही या वेळी देण्यात आले.
 
महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनने विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 14 डिसेंबरला लाक्षणिक संप पुकारला होता. या पार्श्वभूमीवर कामगारमंत्री पाटील यांनी आज मंत्रालयात बैठक आयोजिली होती. माथाडी युनियनचे नेते, माजी आमदार नरेंद्र पाटील, आमदार शशिकांत शिंदे, कामगार विभागाच्या प्रधान सचिव वनिता सिंघल, सहसचिव साठे, सहकामगार आयुक्त (माथाडी) रविराज इळवे, युनियनचे संयुक्त सरचिटणीस व जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख, चंद्रकांत पाटील, दिलीप खोंड, अध्यक्ष एकनाथ जाधव आदींसह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

टोल चुकविणा-यांच्या 'आयडिया' फसल्या; पोलिस खात्यावर व्यवस्थापन नाराज 

माथाडी कामगारांना हक्काची कामे करण्यास पोलिस संरक्षण मिळण्याबद्दलच्या प्रश्नासंबंधी गृहमंत्री देशमुख यांनी पोलिस यंत्रणा व संबंधितांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची ग्वाही दिली. कामगार विभागाचे प्रधान सचिव यांचेकडेही संयुक्त बैठक घेऊन सर्व प्रश्नांची एक महिन्याच्या आत सोडवणूक होण्यासाठी आवश्‍यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कोरोनाने मृत्यू झालेल्या कामगारांना विमा संरक्षण द्यावे, रेल्वेने प्रवास करण्यास माथाडी कामगारांना परवानगी मिळावी यांसह माथाडी बोर्डासह अन्य प्रलंबित प्रश्नासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. महिन्याच्या आत प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याची ग्वाही मंत्र्यांनी दिल्याने माथाडी कामगार नेत्यांनी बैठकीत त्यांचे आभार व्यक्त केले.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com