या रस्त्यावर दुभाजकात चक्क कटेरी झुडपांसह झाडवेली

karad
karad

विंग (जि. सातारा) ः सतत वर्दळीच्या कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्यावर दुभाजकाची मोठी दुरवस्था झाली आहे. त्यावर गवत, काटेरी झुडपांसह झाडवेलीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात पसरले आहे. देखभाल, दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांतून नाराजी व्यक्त होत आहे. 

वाहतुकीचा वाढता ताण आणि प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन कऱ्हाड-ढेबेवाडी चौपदरीकरणाचे काम मार्गी लागले आहे. त्यास दोन वर्षे उलटली आहेत. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून त्यास यश मिळाले. 104 कोटी रुपये त्यासाठी खर्च झाला आहे. दुतर्फा 40 फुटांनी रस्ता रुंदीकरण करण्यात आले आहे. आवश्‍यक ठिकाणी फरशी पूल, चौक सुधारणा करून ठिकठिकाणी दुभाजक घातले आहेत. मात्र, देखभाल, दुरुस्तीअभावी रस्त्याची दुरवस्था कायम आहे. विशेषतः दुभाजकावर मोठ्या प्रमाणात झाडवेली वाढली आहे. वाढलेल्या गवतामुळे फुलझाडे दिसेनाशी झाली आहेत. काटेरी झाडे तर डोक्‍याच्या उंचीच्या वर गेली आहेत. नजरचुकीने चेहऱ्यावर अथवा डोळ्यावर त्याचा फटकारा बसून इजा होण्याचा धोका आहे. सुरक्षितता व सुशोभीकरणासाठी लावलेली बॅरिकेटची मोडतोड कायम आहे. 

रस्त्याच्या दुतर्फा झाडवेलीने साइडपट्ट्या अक्षरशः झाकल्या आहेत. महिला उद्योग ते तारूखदरम्यान ही स्थिती आहे. ठिकठिकाणी रस्ता प्रवासाला धोकादायक ठरत आहेत. विशेषतः पावसाळ्यात प्रवासी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ सतत असते. त्यामुळे देखभाल, दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल प्रवाशांतून नाराजी व्यक्त होत आहे. 


रस्त्याचे काम झाल्यापासून पावसाळ्यात ही समस्या कायम असते. वाढलेल्या झाडवेलींमुळे समोरचे वाहन दिसत नाही. त्यामुळे अपघाताची शक्‍यता नाकारता येत नाही. अपघात घडल्यावरच संबंधित विभाग जागा होणार का? 

- दिलीप यादव, शिवसेना, उपतालुकाप्रमुख 
 

(संपादन ः संजय साळुंखे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com