चर्चेचे गुऱ्हाळ नको; बक्षीस द्या!

दोन्ही संस्थांनी तातडीने निर्णय घ्यावा
Maharashtra Kesari
Maharashtra Kesarisakal

महाराष्ट्र केसरीला पुरस्काराची रक्कम न देण्यावर काल (१०) दिवसभरात राजकीय आखाड्यात टिकांची झोड उठली. स्पर्धा देखणेपणात पार पाडली असताना क्रांतिकारकांचा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्याच्या नावाला गालबोट लागले. अनेक मान्यवरांनी बक्षिसांचा वर्षाव केला. संयोजकांकडून मात्र, बक्षिसाची रक्कम देण्याबाबत ठोस निर्णय न घेता एकमेकांकडे बोट दाखवण्यातच समाधान मानण्‍यात आले. कुस्तीच्या परंपरेला हे शोभणारे नाही. दोन्ही संस्थांनी एकत्रित बसून याबाबत तातडीने निर्णय घेऊन स्पर्धेला लागलेला डाग पुसणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पृथ्वीराजनेही नाराज न होता नव्या जोमाने कुस्ती क्षेत्रातील नवीन क्षितीजे पादाक्रांत करण्याकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

तब्बल ६० वर्षांनंतर साताऱ्याला राज्याच्या कुस्ती क्षेत्रातील सर्वोच्च मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धांच्या यजमानपदाचा मान मिळाला. सातारकरांसाठी, जिल्ह्याच्या नावलौकिकासाठी ही नक्कीच भूषणावह बाब होती. त्याचबरोबर जिल्ह्यातील मरगळलेल्या कुस्तीगीरीला ऊर्जितावस्था आणण्यासाठी या स्पर्धेचे जिल्ह्यात आयोजन महत्त्‍वाचे होते.

स्पर्धेचे नेटके नियोजन

स्पर्धेच्या संयोजनावरून सुरवातीपासूनच दोन गटांत कलगीतुरा रंगला होता. शेवटी हा फड सोडविण्याची जबाबदारी कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांना आपला शब्द वापरावा लागला. शरद पवारांच्या निर्णयामुळे जिल्हा तालीम संघाला स्पर्धेच्या नियोजनाची जबाबदारी दिली. तालीम संघाने स्पर्धेचे नेटके नियोजनही केले. वादळी वाऱ्याच्या तडाख्यात कोसळलेल्या मैदानाला एका रात्रीत सावरून अंतिम लढती दिमाखात पार पाडण्यात आल्या. छत्रपती शाहू क्रीडा संकुलाच्या उभारणीनंतर कोणत्याही स्पर्धेला जमली नसेल अशी गर्दी अंतिम लढतीत एकत्र दिसली. त्यामुळे जिल्हावासीयांचा ऊर अभिमानाने फुलून गेला होता. शेवट गोड तर, सर्व गोड या उक्तीप्रमाणे स्पर्धा पार पडल्यानंतर झाले गेले विसरून सर्वांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य पसरले होते.

दोन संस्थांतील वाद हानिकारक

स्पर्धेच्या संयोजनात कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला असताना महाराष्ट्र केसरी मल्लास दिल्या जाणाऱ्या एक लाखाच्या बक्षिसावर राज्यात गदारोळ उठला. वास्तविक स्पर्धेच्या दिवशीच हा प्रश्न मार्गी लागणे आवश्यक होते. परंतु, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलने खंत व्यक्त केल्यानंतर तरी, जिल्हा तालीम संघ व कुस्तीगीर परिषदेने शहाण्याची भूमिका घेत बक्षिसाची रक्कम तातडीने मानकऱ्यापर्यंत पोचवायला पाहिजे होती. परंतु, दोन्ही संस्थांनी एकमेकांकडे बोट दाखविण्यात धन्यता मानली. ही बाब राज्यातील कुस्ती शौकिनांबरोबर जिल्ह्यातील नागरिकांना रूचली नाही. त्यामुळे दिवसभर साताऱ्याचे नाव चुकीच्या गोष्टीसाठी चर्चेत राहिले. कुणी कोणाला कल्पना दिली नव्हती.

जिल्ह्यातील नेत्यांनी मनात आणले तर...

जिल्ह्याचे नाव नको त्या मुद्यात समोर आल्याचे दिसल्यावर जिल्ह्यातील नेत्यांनी तातडीने वैयक्‍तिक बक्षिसे जाहीर केली. त्यामुळे जिल्ह्यातून पृथ्वीराजसाठी बक्षिसाची मोठी रक्कम जमा झाली. परंतु, जिल्ह्यात एवढी मोठी कुस्ती स्पर्धा होत असताना मान-अपमान बाजूला सारून नेत्यांनी स्पर्धेपूर्वीच बक्षिसे जाहीर केली असती तर, त्याचे मोल अधिक वाढले असते. त्यात कोणाला राजकीय रंग दिसला नसता. त्याचबरोबर केवळ बक्षीस जाहीर करून जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचे काम संपत नाही. जागतिक पातळीवर नावाजलेली जिल्ह्यातील कुस्ती पुन्हा त्याच दिमाखात उभी राहण्यासाठी आपण काय करणार, याचे आत्मचिंतनही नेत्यांनी करणे आवश्यक आहे. मनात आणले तर, कुस्तीला काही कमी पडणार नाही, याची तजवीज करण्याची सक्षमता त्यांच्याकडे नक्कीच आहे.

पदके मिळवली पण, शाबासकी कोण देणार?

साताऱ्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली. ती अतिशय छान पद्धतीने झाली. महाराष्ट्र केसरीवर बक्षिसांची खैरात झाली. पण, उपमहाराष्ट्र केसरी उपेक्षित राहिला. त्याचबरोबर स्पर्धेत विविध वजनगटांत पदके मिळवलेल्या सातारा जिल्ह्यातील सहा पैलवानांनाही कुणीही बक्षीस जाहीर केले नाही. एकीकडे तुपाशी तर एकीकडे उपाशी, अशी गत झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com