
कार्यकारी अभियंता लाचप्रकरणी जाळ्यात
सातारा - कामाचे बिल काढून ते वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यासाठी दोन टक्के प्रमाणे ९२ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी मृदू व जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे.
सतीश पंचाप्पा लब्बा (वय ४८, मूळ रा. सिद्धेश्वर पेठ, सोलापूर, सध्या रा. सदरबझार) असे त्याचे नाव आहे. यातील तक्रारदाराने मृदू व जलसंधारण विभागाचे काम केले होते. या कामाचे बिल काढण्यासाठी लब्बा याने त्यांना दोन टक्केप्रमाणे ९२ हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्या अर्जावरून पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये लब्बा याने ९२ हजार रुपयांची मागणी केल्याचे समोर आले. त्यामुळे आज मृदू व जलसंधारण विभागात सापळा रचण्यात आला. त्यामध्ये लब्बाला ९२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले.
उपअधीक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सचिन राऊत, हवालदार राजे, काटकर, येवले व भोसले यांनी ही कारवाई केली. कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Web Title: Executive Engineer Caught In Bribery Case Satara
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..