एसटी महामंडळाचे दुर्लक्ष; रहिमतपूरकरांना हव्यात सुविधा

ऋषिकेश पवार
Friday, 30 October 2020

एसटी महामंडळ प्रशासनाचे रहिमतपूर बस स्थानकावरच नाही, तर प्रवाशांकडेही दुर्लक्ष सुरू आहे. तेव्हा वरिष्ठांनी लक्ष काढून बसच्या वेळांबरोबर रहिमतपूर बस स्थानकावरही लक्ष देण्याची मागणी होत आहे.

रहिमतपूर (जि. सातारा) : येथील बस स्थानक रस्ते ठेकेदाराचा अड्डा बनला असून, स्थानकाला वर्कशॉपचे स्वरूप आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, तसेच बस स्थानकावर येणाऱ्या बसची संख्या व त्यांचे वेळापत्रकही प्रवाशांची डोकेदुखी ठरते आहे.
 
कोरोना महामारीचा परिणाम सर्व उद्योगधंद्यांवर झालेला आहे. कोरोना काळात एसटी सेवा बंद असल्याने याचा फायदा घेत एका रस्ते बांधकाम ठेकेदाराने बस स्थानक आपल्या कामाचा व कामगारांचा अड्डा बनवले आहे. बस स्थानकाच्या आवारात ठेकेदाराने रस्त्यासाठी लागणारा कच्चामाल, स्टील, पाइप आदीचा साठा बिनधास्तपणे केलेला आहे. या ठिकाणी कामगारांच्या वास्तव्यापासून ठेकेदाराची खासगी वाहने, रस्ते कामासाठी लागणारी मशिनरी उभी केलेली आहे. एरवी बस स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर वा बाजूला कोणी वाहने लावली तर एसटी महामंडळाकडून त्याच्यावर कारवाई केली जाते; परंतु बांधकाम ठेकेदाराने एसटी स्टॅंडच्या आतील परिसराचा घेतलेला अनधिकृत ताबा महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही हे विशेष?

आदिवासी विकासचे कर्मचारी बेमुदत संपावर जाण्याच्या तयारीत 
 
बस स्थानकाबरोबर प्रवाशांकडेही महामंडळाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. स्थानकावरील एसटीचे वेळापत्रक पाहता कोरेगाव हे तहसीलचे ठिकाण असून, तेथे बऱ्यापैकी सर्व शासकीय, निमशासकीय कामांसाठी नागरिकांना जावे लागते; परंतु कोरेगावला जाण्यासाठी दिवसभरात फक्त सायंकाळी 6:45 वाजता एसटी उपलब्ध आहे. वडूजला जाण्यासाठी बसच नसून, पुसेसावळीला फक्त एक मुक्कामी बस जाते. साताऱ्यावरून येण्यासाठी सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत एकही बस नाही. कऱ्हाडला जाण्यासाठी सकाळी नऊ वाजता एक बसून ती सायंकाळी साडेपाच वाजता कऱ्हाडवरून माघारी सुटते. परिणामी प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. प्रवाशांची गरज, मागणी लक्षात घेऊन बस वाढवण्याबाबत महामंडळ कसलाही विचार करताना दिसत नाही.

मुंबईकर खूष; आता निमसोडहून परेलला बस 

वरिष्ठांनी लक्ष घालण्याची गरज 

एसटी महामंडळ प्रशासनाचे रहिमतपूर बस स्थानकावरच नाही, तर प्रवाशांकडेही दुर्लक्ष सुरू आहे. तेव्हा वरिष्ठांनी लक्ष काढून बसच्या वेळांबरोबर रहिमतपूर बस स्थानकावरही लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facility Needs On Rahimatpur Bus Stand Satara News