
Satara News : द्राक्ष बागायतदार कंगाल... दलाल मालामाल
कलेढोण : वर्षभर सांभाळलेल्या द्राक्षांना दलाल कवडीमोलाने मागणी घालतोय. व्यापारी बांधावर यायच्या आत, दलाल सौदा करून दिवसाकाठी साठ सत्तर हजारांचे गठूळं बांधून नेतोय. आमचा माल नाशवंत, आज नाही नेला, तर उद्या बांधावर सडणार.
द्राक्षामुळं डोक्यावरच कर्जपाणी कमी व्हायच्या ऐवजी वाढतच चाललंय. आता शेतकऱ्यांनी आत्महत्याच करायची बाकी राहिली, साहेब. ही कैफियत आहे... जिल्ह्यातील द्राक्षबागायतदारांची. स्थानिक दलालीमुळे शेतकऱ्यांच्या मालाला भाव न मिळाल्याने या दलालीविरोधात शेतकऱ्यांनी वज्रमूठ बांधण्याची गरज आहे.
दलाल जोरात- शेतकरी कोमात
यंदा जिल्ह्यात द्राक्षाचे पोषक हवामानामुळे उत्पादन चांगले आले आहे. परिणामी त्यास चांगल्या दराची अपेक्षा शेतकरी करीत असताना दलालांच्या मध्यस्थीमुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेतकऱ्यांच्या बागेत व्यापारी पोचण्या आधी त्याच व्यापाऱ्याला बाजूला घेऊन मांडवली अमक्या व्यक्तीची बाग अमुक दराने मिळवून देतो.
माझे कमिशन बाजूला ठेवा. असा एकांती निरोप दलाल व्यापाऱ्यांना देत आहेत. त्यामुळे दिवसाकाठी हजारो टनांमुळे लाखोंची कमाई दलालभाई करीत आहेत. त्यामुळे दलाल जोरात-शेतकरी कोमात असे चित्र पाहावयास मिळत असल्याचे सतीश भोसले द्राक्षबागायदार यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या एकीचा अभाव
बागेतील माल एक-दोन रुपये कमी मिळाला तरी चालेल? मात्र तो लवकर गेला पाहिजे, यासाठी मालाची बोलणी करण्यासाठी आलेल्या व्यापाऱ्याची-दलालाची माहिती दुसऱ्या शेतकऱ्याला देत नाही. परिणामी दोघाही शेतकऱ्यांना दर कमी मिळतो. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी आपल्यात एकीचे बळ दाखवणे गरजेचे असल्याचे द्राक्षबागायदार अनिल दबडे यांनी सांगितले.
हमीभावासाठी नसल्याने अडचण
द्राक्षास हमीभाव नसल्याने व्यापारी-दलाल वाटेल त्या दराने द्राक्षांची मागणी करीत आहे. राजकीय पुढारी याकडे काणाडोळा करताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या लुटीच्या विरोधात राजकीय पुढाऱ्यांनी आवाज उठवला पाहिजे. मात्र, दुर्दैवाने तसा राजकीय नेता द्राक्ष बागायतदारांमागे नाही.
असा घेतला जातो गैरफायदा
नोंदणी केलेल्या द्राक्षमालकाने द्राक्षातील शुगर सँपलसाठी दिली, की त्याचा रिपोर्ट ८-१० दिवसांनी येतो. त्या वेळेचा दर ६५ रुपये प्रतिकिलो असेल, तर रिपोर्ट आल्यानंतर तो दर ५० रुपयांवर येतो. अशा परिस्थिती द्राक्षबाग पुन्हा ऑनलाइन नोंदणीकरून एक्स्पोर्ट करणे शक्य होत नाही. नेमका या संधीचा फायदा व्यापारी-दलाल घेत असल्याने शेतकऱ्यांना दर कमी दिला जात असल्याचे सुहास शेटे यांनी सांगितले.
मार्च एण्ड अन् कर्जाचा बोजा
वर्षभराच्या मेहनतीने फुलविलेल्या द्राक्षबागांतून चांगल्या नफ्याची स्वप्ने पाहणाऱ्या शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेतले आहे. कोरोनानंतर चांगल्या दराची अपेक्षा करीत असतानाच दलालीमुळे त्यांची स्वप्ने भंगली आहेत. मार्च एण्ड आल्याने बॅंकांचे थकलेले हप्ते भरावे लागणार आहेत. अपेक्षित नफा न झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत आहे. त्यामुळे मायबाप सरकार, आता फक्त आत्महत्या करायची बाकी हाय? अशी आर्त हाक बळिराजा राज्यकर्ते, प्रशासनास करीत आहे.