बाजारात कोथिंबिरीला कवडीमोल भाव; हताश शेतकऱ्याने पिकावर फिरविला रोटर

ऋषिकेश पवार
Thursday, 19 November 2020

नेर (ता. खटाव) येथील शेतकरी गणेश बनकर यांनी घाऊक बाजारात कोथिंबिरीस कवडीमोल भाव असल्याने काळजावर दगड ठेऊन अर्ध्या एकरातील कोथिंबीर पिकावर रोटर फिरविला.

विसापूर (जि सातारा) : सततच्या दुष्काळ आणि कधी अस्मानी, तर सुलतानी संकटाला तोंड देणाऱ्या बळीराजाला चालू वर्षी लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर कवडीमोल दराने भाजीपाला विकावा लागला. सध्यादेखील तशीच परिस्थिती सुरू असल्याने घाऊक बाजारात कोथिंबिरीस शेकडा 100 ते 150 रुपये दर मिळत आहे. त्यात उत्पादन खर्च तर सोडाच; पण मालाचा वाहतूक खर्चदेखील निघत नसल्यामुळे उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. 

नेर (ता. खटाव) येथील शेतकरी गणेश बनकर यांनी घाऊक बाजारात कोथिंबिरीस कवडीमोल भाव असल्याने काळजावर दगड ठेऊन अर्ध्या एकरातील कोथिंबीर पिकावर रोटर फिरविला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजीपाला पिकांच्या दरात गेल्या सात ते आठ महिन्यांपासून दरात मोठी घसरण झाली असून, उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. काबाडकष्ट करून पिकवलेला भाजीपाला बाजारापर्यंत नेण्यासाठी गाडीभाडे सुद्धा खिशातून भरण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती दुष्काळात तेरावा महिना अशीच झाल्याचे चित्र आहे. 

VIDEO : व्वा रं पठ्ठ्या! दुष्काळी पट्ट्यात शेतकऱ्याची विक्रमी कामगिरी; झेंडूतून मिळवले तब्बल साडेपाच लाखांचे उत्पन्न

भाजीपाल्याला हमीभाव मिळत नाही. नगदी पीक म्हणून शासन त्याकडे दुर्लक्ष करते. हजारो रुपये खर्च करून भाजीपाला पिकवायचा आणि बाजारात गेल्यानंतर अपेक्षित दर मिळत नसल्याने उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चिंताजनक बनली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers Are Worried About Crop Losses Satara News