esakal | 'महाविकास'ने आमच्या हिताचा निर्णय घ्यावा; शेतक-यांचे पृथ्वीराज चव्हाणांना साकडे
sakal

बोलून बातमी शोधा

'महाविकास'ने आमच्या हिताचा निर्णय घ्यावा; शेतक-यांचे पृथ्वीराज चव्हाणांना साकडे

शासनाने तातडीने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा बळिराजा शेतकरी संघटना, रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

'महाविकास'ने आमच्या हिताचा निर्णय घ्यावा; शेतक-यांचे पृथ्वीराज चव्हाणांना साकडे

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड : अतिवृष्टीने जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांसह ऊस, फळे, भाजीपाला, पालेभाज्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने नुकसानीची भरपाई देणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामेही करण्यात आले. ज्या शेतकऱ्यांचे 33 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पीक नुकसान आहे, अशाच पिकांचे पंचनामे करण्यात आले. या जाचक अटीमुळे उर्वरित पिकांचे शासनाचे पंचनामेच झाले नाहीत. परिणामी अनेक शेतकरी पीक नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहणार आहेत.
 
सातारा जिल्ह्यात खरीप हंगामातील भात, सोयाबीन, भुईमूग, ज्वारी, बाजरी, मक्‍यासह अन्य पिके, तृणधान्य, कडधान्य व गळीत धान्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यंदा टप्प्याटप्प्याने पाऊस झाल्याने पिकेही चांगली आली होती. मात्र, वादळी पावसाने जिल्ह्यातील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतात पाणी साचून काढणीस आलेल्या पिकांवरच पाणी फिरले. सोयाबीन पाण्यात गेले, भुईमुगाच्या शेंगांना जमिनीखालीच मोड आले, भात आणि ऊस पीक पावसाने जमीनदोस्त झाले. खरीप ज्वारी काळी पडली.

लग्नाअगोदर बारसे घालायची अनेकांना घाई; जयकुमार गाेरेंचा 'राष्ट्रवादी'ला टाेला
 
शासनाने भरपाईसाठी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पंचनामे झाले. मात्र, ज्या शेतकऱ्यांचे 33 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पीक नुकसान आहे, अशाच शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्यात आले. उर्वरित पिकांचे पंचनामेच झाले नाहीत. अजूनही पाऊस सुरू आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांच्या पिकांचे आणखी नुकसान होऊ शकते. ते गृहीत न धरताच पंचनामे उरकण्यात आल्याने अनेक शेतकरी पीक नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहणार आहेत. 

सरसकट पंचनाम्यांची मागणी 

शेतकऱ्यांच्या पिकांचे 33 टक्केच नुकसान झाले तर पंचनामे करावेत, हा जाचक निर्णय शेतकरी हिताचा नाही. सध्या आर्थिक मंदी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच ही 33 टक्‍क्‍यांची जाचक अट्ट सकारने घातली आहे, हे अन्यायकारक आहे. शासनाने तातडीने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा बळिराजा शेतकरी संघटना, रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. 

सर्व खटाटोप पैशासाठी चालला आहे; उदयनराजेंचा बेधडक आराेप

ऊस उत्पादकांवरही अन्याय 

अतिवृष्टीने ऊस पिकालाही मोठा फटका बसला. पावसाबरोबर आलेल्या वादळी वाऱ्याने अनेक शेतकऱ्यांचा ऊस जमीनदोस्त झाला. अनेक ठिकाणी शिवारात ऊस पडला आहे. त्यासाठी शासनाकडून 10 ते 15 टक्के उसाचे नुकसान धरले जात आहे. त्याचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत. ऊस वाहून गेला असेल तरच त्याचे पंचनामे केले जात आहेत. ऊस उत्पादकांसाठी हा निर्णय अन्यायकारक ठरला आहे.

आता नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणारे शेतकरी देणार कृषीविषयक सल्ला 

तेहतीस टक्‍क्‍यांवरील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येतात. राज्य शासनाचा हा निर्णय आहे. त्याबाबत अनेकांनी 25 टक्के नुकसान धरावे, अशी मागणी केली. अंदाज काढणे सोपे नाही. मात्र, शासन निर्णय असल्याने काही करता येत नाही. 
- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top