माजी ग्रामपंचायत सदस्यावर चाकू हल्ला; हॉटेल मालकासह संशियतांना जामीन

सिद्धार्थ लाटकर
Saturday, 9 January 2021

पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे हे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान संबंधितांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आल्याचे पाेलिस ठाण्यातून सांगण्यात आले.

सातारा : केसुर्डी (Kesurdi) येथील माजी ग्रामपंचायत सदस्यावर एका हॉटेल मालकाने चाकूने हल्ला करीत गंभीर जखमी केल्याची घटना नुकतीच घडली. या हल्ल्यात माजी ग्रामपंचायत सदस्यांसह अन्य गटांतील तिघे जखमी झाले आहेत. या मारामाराची दखल घेत शिरवळ पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रारीवरून हॉटेल मालकासह दोन्ही गटांतील सहा जणांना अटक केली हाेती. न्यायालयाने संबंधितांची जामिनावर मुक्तता केली.
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा

शिरवळ पोलिसांनी दिलेली माहितीनसूार, केसुर्डी येथे देवीलाल दादा जाधव (वय ३१, सध्या रा. शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा मूळ रा. शेनवड, ता. राहुरी, जि. नगर) याने भाडेतत्त्वावर हॉटेल चालविण्यास घेतले आहे. केसुर्डी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य संजय तुकाराम ढमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संजय ढमाळ हे हॉटेलमध्ये जेवल्यानंतर हॉटेलच्या बाहेर सुनील ढमाळ व रामचंद्र ढमाळ यांच्याशी बोलत असताना हॉटेलचे मालक देवीलाल जाधव याने हॉटेलच्या बाहेर येत संजय ढमाळ यांना अचानकपणे मारण्यास सुरुवात केली. देवीलाल जाधव यांनी हॉटेलमध्ये परत जात चाकू व कोयता आणत ‘तुला सोडतच नाही,’असे म्हणत संजय ढमाळ यांच्या तोंडावर, नाकावर, ओठांवर व हनुवटीवर चाकू मारल्याने संजय ढमाळ हे गंभीर जखमी झाले, तर प्रशांत ढमाळ याच्या हाताला सुरी लागल्याने तो जखमी झाला.

मी पाचवडला जाऊन येतो, असे सांगून घरा बाहेर पडलेल्या मुलाचा झाला खून! 

यावेळी सुनील ढमाळ व रामचंद्र ढमाळ हे भांडणे सोडवीत असताना देवीलाल जाधव व हॉटेलमधील कामगार राजेंद्र पांडुरंग जाधव (४१, रा. सध्या केसुर्डी, ता. खंडाळा, जि. सातारा, मूळ रा. चिपळूण, जि. रत्नागिरी) व कामगार प्रवीण सुरेश राठोड (२७, रा. सध्या खंडाळा, मूळ रा. ढवळपुरी, ता. पारनेर, जि. अहमदनगर) यांनी संबंधितांना मारहाण करीत शिवीगाळ केली. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली आहे.

मंगलाष्टका सुरु असतानाच पोलिस शिरले मंडपात अन् म्हणाले, सावधान!

देवीलाल जाधव याने दिलेल्या फिर्यादीनुसार, केसुर्डी येथील संजय ढमाळ यांना हॉटेलच्या गेटसमोरून बाजूला उभे राहा असे म्हटल्याचा कारणावरून चिडून जाऊन गावातील लोकांना फोन करून बोलावत होते. देवीलाल जाधव हा हॉटेलमध्ये कांदा कापत असताना हॉटेलबाहेर गोंधळ ऐकू आल्याने बाहेर आल्यानंतर केसुर्डी येथील योगेश दादासाहेब ढमाळ (२५) हा भांडणे मिटवायची आहेत, तर सुरी घेऊन कशाला आला असे म्हणत हात धरून पकडू लागल्यानंतर झालेल्या झटापटीमध्ये समोर उभे असलेल्या केसुर्डी येथील संजय ढमाळ यांच्या तोंडाला सुरी लागली, तर हातातील सुरी हिसकावून घेत असताना सुरी तुटल्याने तुटलेली सुरी घेऊन योगेश ढमाळ याने मारल्याने देवीलाल जाधव याच्या अंगठ्याजवळ जखम झाली. प्रशांत रमेश ढमाळ (२३, रा. केसुर्डी) याने लोखंडी रॉडने देवीलाल जाधव याला मारहाण केली आहे. याप्रकरणी दोन्ही गटांतील सहा जणांना अटक केली.  पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे हे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान संबंधितांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आल्याचे पाेलिस ठाण्यातून सांगण्यात आले.

उदयनराजेंचा सिंघम स्टाईल अंदाज; अभी के अभी म्हणत उडवली पुन्हा काॅलर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fighting Between Ex Grampanchayat Member Hotel Owner Near Kesurdi Satara Crime News