
Satara News : उसाच्या रानात ‘लुटणारे कोल्हे’
पिंपोडे बुद्रुक : साखर कारखान्यांनी ोडणीच्या दरात वाढ करूनही हार्वेस्टर चालक आणि ऊस टोळ्यांकडून शेतकऱ्यांकडे जादा पैशाची मागणी सुरू आहे. उसाच्या रानात लूटमार करणारे कोल्हे शिरल्याने शेतकरी बेजार झाले आहेत.
हार्वेस्टर मशिनचे चालक ऊसतोडणीपूर्वीच शेतकऱ्यांकडे पैशांची मागणी करत आहेत. फडाची पाहणी करून अंतिम तडजोड केली जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या यंत्रणेत बळीराजाचाच ‘बळी’ जात असून, सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. मुबलक पावसाने गेल्या दोन वर्षीपासून उसाचे क्षेत्र वाढले आहे.
या परिसरातून किसन वीर, जरंडेश्वर, शरयू, अजिंक्यतारा, श्री दत्त इंडिया, स्वराज या साखर कारखान्यांना ऊस दिला जातो, तसेच हा ऊस वेळेत गाळपाला जावा, याकरिता नाइलाजाने शेतकरी जादा रक्कम देण्यास तयार होत आहेत.
उसाचे क्षेत्र कमी असलेल्या फडात हार्वेस्टर चालक मशिन चालवत नाहीत. शेतकऱ्याची गरज ओळखून अडवणूक केली जात असल्याने मागेल ती रक्कम त्यांना द्यावी लागते.
सध्या एकर-दीड एकर क्षेत्रासाठी एकरी तीन ते चार हजार रुपये घेतले जात आहेत. उत्पादन खर्चात वाढ झाल्याने लहान शेतकरी या मागणीने आर्थिक संकटात सापडत आहेत.
एकरी पैशाची मागणी त्याचबरोबर हार्वेस्टर मशिनचे चालक, हेल्पर, मुकादम अशा पाच ते सहा जणांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था शेतकऱ्यांनाच करावी लागते, तसेच ड्रायव्हरला ‘चपटी’ आणि १०० रुपये एन्ट्रीसाठी द्यावे लागत आहेत.
गत दोन वर्षे येथील कार्यक्षेत्रातील एक सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत असल्यामुळे इतर खासगी कारखान्यांना ऊस द्यावा लागला. तेव्हा शेतकऱ्यांनी ऊस शिल्लक राहू नये, या भीतीने एकरी दहा हजारांपर्यंत जादा पैसे मोजलेत. या लुटमारीमुळे काही अल्पभूधारक ऊस लागणीकडे यंदा पाठ फिरवली आहे.
सध्यातरी ‘फड सांभाळ तुऱ्याला रं आला, तुझ्या उसाला लागला कोल्हा’ अशी परिस्थिती ऊस उत्पादकांवर आली आहे. शेतकऱ्याची ही पिळवणूक न थांबल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अमोल आवळे यांनी दिला आहे.
कारखान्याकडून पैसे मिळत असताना हार्वेस्टर चालक आमच्याकडूनही पैसे घेत आहेत. स्लीप बॉयपासून सर्वांचे हात ‘ओले’ करावे लागतात. शासन आणि कारखाने राजकीय हेतूने याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
- सूरज भोईटे, ऊस उत्पादक शेतकरी, वाघोली.