
Satara News : करोडोची रोल्सरॉईल्स घेण्यापेक्षा कामगारांना अर्थसाह्याचे समाधान
सातारा : अनेक मोठ्या माणसांची मनेही तेवढीच मोठी असतात. देशात अनेक उद्योजक घराणी आहेत. त्यात येथील कूपर घराण्याचे नावही सर्वतोमुखी आहे. या घराण्याने देशाच्या विकासाला हातभार लावतानाच आपल्या कामगारांचीही कुटुंबातील सदस्यांप्रमाणे काळजी घेणारेही उद्योजक आहेत.
याची प्रचिती कूपर उद्योगसमूहाचे प्रमुख फरोख कूपर यांनी नुकतीच दिली. कूपर उद्योगास शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी सर्व कामगारांना नुकतेच प्रत्येकी दहा हजारांचे बक्षीस दिले.
अनेक उद्योजक आपल्या कामगारांचा विचार न करता स्वतःच्या सुखाचा विचार करतात; पण येथील फरोख नरिमन कूपर मात्र वैयक्तिक चैन, महागड्या आलिशान गाड्या, अतिउच्च राहणीमान याकडे लक्ष न देता ते उद्योगाची व उद्योगाला भरभराट आणणाऱ्या कामगारांची काळजी घेत आहेत.
फरोख कूपर यांनी उद्योगाच्या शताब्दी वर्षानिमित्त नुकतेच दोन हजार २२० कामगारांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे अनुदान देऊन कामगारांना सुखद धक्का दिला. कामगार आणि कामगार प्रतिनिधींनी नवरोज व गुढीपाडव्याला मिळालेल्या या भेटीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कूपर उद्योग समूहाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने कामावर असणाऱ्या कायम, अजिंक्य, फोर्बस्, सोर्स व इतर कंत्राटी अशा सर्व कामगारांना त्यांनी दहा हजारांची भेट दिली. याबाबत श्री. कूपर म्हणतात, ‘‘या उद्योगाच्या भरभराटीसाठी आपल्यासह आधीच्या पिढ्यांचे सहस्त्र हात लागले आहेत.
आजोबा सर धनजीशा कूपर यांनी साताऱ्यातील स्थानिकांना सोबत घेऊन हा उद्योग उभा केला. कूपर उद्योगसमूह साताऱ्यासारख्या ग्रामीण भागात आपली पाळेमुळे जोडून उभारला. त्यात कामगार, कर्मचाऱ्यांचा वाटा मोठा आहे.
आपल्याशी दाखवलेला स्नेह व आपणाकडूनही आमच्याबद्दल दाखविलेला आदर अशा निकोप संबंधातून कूपर उद्योगाचा वटवृक्ष वाढला आहे. उद्योगाच्या प्रगतीसोबतच सर्वांची आर्थिक, सामाजिक उन्नती व्हावी, आमच्या समाजशील उद्योगाचा गाभा राहिला आहे.’’
आज कूपर उद्योगात आजूबाजूच्या ५० किलोमीटर परिसरातील सर्व स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. साताऱ्यातील बऱ्याच उद्योगांत मोठ्या संख्येने बाहेरील परप्रांतीय कामगार आणून त्यांना काम दिले जाते; परंतु आम्ही या मातीची नाळ तोडली नाही.
परस्परांवरचा विश्वास व स्नेह यातून आपण एकत्र प्रगती करत आहोत. आजोबा सर धनजीशा कूपर यांनीच फक्त कूपर उद्योगाचा पाया घातला नाही, तर त्याकाळी ते एक समाजसुधारक, राजकारणी होते.
सातारा नगरपालिकेचे १० वर्षे अध्यक्ष, १९३७ मध्ये तत्कालीन बॉम्बे प्रेसिडेन्सी इलाख्याचे मुख्यमंत्री म्हणून लोकाभिमुख कार्य केले आहे. त्यांनी त्याकाळी देशातील पहिले डिझेल इंजिन बनविले आहे.
नांगराच्या फळापासून सुरू झालेला हा उद्योग आज इंजिन कॉम्पोनंट, तीन ते ६०३ एचपी इंजिन व ट्रॅक्टर बनवितो. सर्व मोठ्या देशातील कंपन्यांना उत्कृष्ट दर्जाचा माल पुरवतो. नुकतेच दक्षिण आशिया व आशियायी देशातील अग्रगण्य असणाऱ्या इंडियन मशिन टूल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयएमटीएमए) या संस्थेने सर धनजीशा कूपर यांच्या वर ‘कॉफी टेबल बुक’ व लघु चित्रफीत प्रसारित करून सन्मान केला. आजोबा या संस्थेचे संस्थापक सदस्य व अध्यक्ष होते, हे त्यांनी या वेळी आवर्जून सांगितले.
कूपर उद्योग घेतो कामगारांची काळजी
कोविड काळात कंपनी बंद असताना कामगारांना भत्त्यासह पगार सुरू
सर्व कामगार, कर्मचाऱ्यांचे कोविड काळात कंपनीतच लसीकरण
कुटुंबीयांसाठी नरिमन कूपर ट्रस्टमार्फत स्त्रियांना आर्थिक उन्नतीसाठी मदत
होमाई कूपर उद्योगामार्फत मदत
सर्व कामगार, कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी वर्षातून दोनदा शिबिर
पाल्यांना शिष्यवृत्ती व बक्षिसे देऊन त्यांच्या शिक्षणास मदत
कामगारांना सोया दूध व सकस आहार
ईएसआयसी बाहेर असणाऱ्या कामगारांची मेडिक्लेम पॉलिसी
कामगाराचे दुर्दैवी निधन झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना सहा लाखांपर्यंत मदत
सोसायटीच्या माध्यमातून शैक्षणिक, वैयक्तिक, घर बांधणीसाठी कर्ज
सुमारे ३०० पेक्षा जास्त कामगार व कर्मचारी २५ वर्षे कामावर कार्यरत
अनेक कंपन्यांमध्ये सहा महिने कामावर घेऊन कामगारांना कामावरून काढले जाते; परंतु आमच्याकडे कामगारांनी स्वतः एकत्र येऊन उभारलेल्या अजिंक्य स्वयंम रोजगार संस्थेच्या माध्यमातून कायम रोजगार दिला जातो. त्यांना कामातील कौशल्ये शिकून आर्थिक उत्पन्न क्षमता वाढवता येते. यापुढेही कामगारांच्या सहकार्याने उद्योगाची प्रगती होत राहील.
- फरोख कपूर