
Satara News : वडगाव हवेलीत भीषण आग; पाईपचं कोट्यवधींचं नुकसान
रेठरे बुद्रुक : वडगाव हवेली येथे मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीमध्ये कोट्यवधी रुपयांची हानी झाली आहे. तेथील पेयजल योजनेस आणलेल्या पाईपच्या साठ्यास अचानक आग लागल्याने सर्व साठा जळाला. यामध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
घटनेनंतर ग्रामस्थांनी धाव घेतली. परंतु आग खूप भीषण असल्याने सर्वांनाच हतबल व्हावे लागले. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, वडगाव हवेली येथे दहा कोटी ३२ लाख रुपये किंमतीची पेयजल योजना मंजूर झाली आहे.
सदरच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे. महिनाभरापूर्वी योजनेस लागणारी एचडीपी प्रतीच्या पाईप महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेने संबंधित ठेकेदार कंपनीच्या ताब्यात दिल्या होत्या. सोळा पाईपचा एक बंडल याप्रमाणे तब्बल बारा कंटेनरमधून पाईपचा साठा वडगाव हवेली येथे पोहच करण्यात आला.
तेथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागील मैदानात याचा साठा ठेवण्यात आला होता. लवकरच हे काम सुरू होईल, असा अंदाज होता. परंतु काल मध्यरात्री अचानक पाईपच्या साठ्याला आग लागली. आगीचा उडालेला भडका पाहून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. आग इतकी भीषण होती की, तिला विझवणे कठीण असल्याने सर्वांनाच हतबल व्हावे लागले.
दरम्यान घटनास्थळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेचे अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी पोलिसांना पाचारण केले होते. तसेच आज सकाळी घटनेचा पंचनामा करण्यात आला.