मेढ्यात किराणा मालाचे दुकान जळून खाक; लाखोंचे नुकसान

सूर्यकांत पवार
Thursday, 8 April 2021

एवढी मोठी घटना घडूनही नगरपंचायतीची यंत्रणा मात्र मदतीला पोचू शकली नाही. त्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर आहे.

कास (जि. सातारा) : मेढा एसटी डेपोजवळ असणाऱ्या किराणा मालाच्या दुकानास लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, आग कशामुळे लागली, यांचे कारण समजले नाही.
 
सातारा-महाबळेश्वर रस्त्यावर मेढा एसटी डेपोजवळ चंद्रकांत चिंचकर यांच्या मालकीचे किराणा मालाचे दुकान गेल्या 25 वर्षांपासून आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास या दुकानाला अचानक आग लागली. परिसरातून मोठे धुराचे लोट दिसू लागल्याने एकच खळबळ उडाली. ही बाब लक्षात येताच स्थानिक युवक, नागरिकांनी चार तास आग विझविण्याचा प्रयत्न केला.

विलास पवार, सुनील जवळ, अंकुश कदम यांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपले पाण्याचे टॅंकर आणून आग विझविण्यासाठी विशेष सहकार्य केले. सातारा नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाचे वाहनही घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्यास सहकार्य केले. आग एवढ्या मोठ्या प्रमाणावर फैलावली होती, की दुकानातील साहित्य अक्षरक्ष: जळून खाक झाले.
 
दरम्यान, या दुकानाचे बांधकाम आरसीसी असल्याने आग आजूबाजूच्या परिसरात पसरली नाही. तसेच शेजारील दुकानाचे या आगीमुळे नुकसान झाले नाही. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. एवढी मोठी घटना घडूनही नगरपंचायतीची यंत्रणा मात्र मदतीला पोचू शकली नाही. त्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर आहे. घटनास्थळाचा पंचनामा मेढ्याचे तलाठी सावंत यांनी केला असून, सुमारे 12 लाखांचे आर्थिक नुकसान झाल्याचा त्यांनी अहवाल तयार केला आहे.

शिवेंद्रसिंहराजेंच्या शब्दास मान; नगराध्यक्षांचा राजीनामा 

गोळेश्वरकरांना कऱ्हाडचे पाणी मिळणार नाही; पालिकेचा ठराव

ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे धावडेत साकव पुलाचे काम रखडले; गृहराज्यमंत्री घालणार लक्ष?

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire Near ST Depo Medha In Grocery Shop Satara Marathi News