लंडनला जाणारा पहिला मराठी माणूस माहितेयं? सातारच्या छत्रपतींचा 'हा' सेनापती डायरेक्‍ट लंडनला! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लंडनला जाणारा पहिला मराठी माणूस माहितेयं?  सातारच्या छत्रपतींचा 'हा' सेनापती डायरेक्‍ट लंडनला!

लंडनला गेलेल्या शिष्टमंडळासोबत एक मुस्लिम गृहस्थही होते. या शिष्टमंडळास लंडनला फारसे यश प्राप्त झालं नाही, त्यामुळे त्यांना अपयशी माघारी परतावं लागलं होतं. 

लंडनला जाणारा पहिला मराठी माणूस माहितेयं? सातारच्या छत्रपतींचा 'हा' सेनापती डायरेक्‍ट लंडनला!

सातारा : सातारा जिल्हा म्हणजे शूरांची आणि वीरांची कर्मभूमी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि युगपुरुष म्हणून समाज ज्यांच्याकडे पाहतो त्या थोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेला हा जिल्हा नैसर्गिक सौंदर्याचे वरदान लाभलेल्या सह्याद्रीच्या कुशीत वसला आहे. उज्ज्वल परंपरा, देदिप्यमान इतिहास आणि थोर पराक्रमाची पार्श्वभूमी लाभलेल्या ह्या जिल्ह्यात महान साधूसंत आणि थोर ज्ञानी, पराक्रमीही होऊन गेले. यामध्ये कन्हेरखेड (सातारा) महर्षी शिंदे , फलटणच्या सईबाई निंबाळकर, तळबीडचे (कराड) हंबीररावजी मोहिते, खटावचे प्रतापराव गुजर भोसरे, गोडवलीचे तानाजी मालुसरे, कोंडवळीचे (वाई) जिवाजी महाले, धावडशीच्या महाराणी लक्ष्मीबाई , तळबीडच्या रणमर्दिनी महाराणी ताराबाई, नायगावच्या सावित्रीबाई फुले, साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले, सेनापती यशवंतराव शिर्के अशी असंख्य उदाहरण देता येतील.
 
स्वराज्यात शिर्के घराण्याचे मोठं योगदान आहे. छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले यांचे सेनापती यशवंतराव शिर्के हे त्यातीलच एक उदाहरण! प्रतापसिंहराजेंचा 1793 ते 1800-80 इतका कालखंड.. इंग्रज भारतात आल्यानंतर भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशात व्यापारी संबंध प्रस्थापित झाले. ज्याप्रमाणे इंग्लंडहून गोरे साहेब लोक भारतात येत होते, तसे भारतातून आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने लोक इंग्लंडला जात होते. महाराष्ट्रातून सर्वप्रथम ब्रिटनला जाणारे व्यक्ती म्हणून रंगो बापूजी गुप्ते आणि भोर संस्थानचे पंतसचिव भगवंतराव पंडित यांचे नाव घेतले जाते. परंतु यांच्याही चार वर्ष आधी 19 मार्चला 1835 यशवंतराव शिर्के हे सातारहून लंडनला जाऊन पोहचले होते. इंग्रज महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांना इथल्या जनतेशी संवाद साधायला अडचण येत होती, त्यामुळे त्यांनी इथल्या काही लोकांना इंग्रजीचे शिक्षण दिले.

सर्च-रिसर्च -  शतायुषींच्या देशातील ‘सुपरफूड’

स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांना इंग्रजी ज्ञात असल्याचे अनेक ठिकाणी उल्लेख आढळून येतात. सातारा गादीला एलीफिस्टन याने ग्रॅंड डफ याला रेसिडेंट म्हणून नेमले. छत्रपती सातारा सोडून काशीला असताना ग्रॅंड डफ कारभार बघत होता. त्याला शह देण्यासाठी छत्रपतींनी आपला एक राजदूत लंडनला पाठवण्याची तयारी सुरू केली. ग्रॅंड डफ सातारा संस्थानात अवाजवी कर लादणे, निर्लष्करीकरण करणे, सरदारांच्या जहागिरींना जप्त करण्याचे काम करत होता, त्यावर अंकुश ठेवण्यासाठी महाराजांनी हा मार्ग स्वीकारला होता. महाराजांनी सुरवातीला 1835 मध्ये यशवंतराव शिर्केंना तिकडे पाठवले. त्यानंतर 1839 कालावधीत रंगो बापूजी गुप्ते आणि भगवंतराव पंडित हे लंडनला रवाना झाले होते. या तिन्ही लोकांनी अफगाण-इराक - सीरिया-तुर्कस्तान या मार्गाने इंग्लंड गाठले होते. शिर्के, गुप्ते, पंडीत हे तीन मराठी आणि अन्य पाच भारतीय, ज्यात एक बंगाली मुस्लीमही होते. हे वेगवेगळ्या ब्रिटीश अधिकाऱ्यांना भेटायचे. आठही जण एक बंगला भाड्याने घेऊन त्यात वास्तव्य करत होते. सन 1841 साली हे सर्व लोक लंडनहुन मायदेशी परतण्यासाठी जहाजात बसले असता, माल्टाच्या समुद्रधुनी जवळ रंगो बापूजी गुप्ते यांना सातारा संस्थान खालसा करून, प्रतापसिंहराजेंचे धाकटे बंधू अप्पासाहेब भोसले यांचा वारसाहक्क नाकारण्याची ब्रिटिशांच्या योजनेची माहिती मिळाली.

शताब्दी ऑलिंपिक सहभागाची  

यावेळी क्षणाचा देखील विचार न करता, रंगो बापूजी लंडनला परतले आणि प्रतापसिंहराजेंच्या बंधमुक्ततेसाठी व संस्थान टिकवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्यास सुरुवात केली. पाच सप्टेंबर 1839 ला प्रतापसिंहराजेंनी यशवंतरावांना सेनापतीपदावरून काढलं, असं इतिहासात काही दाखले आढळतात. त्यानंतर यशवंतराव सातारमध्येच स्थायिक झाले. इंग्लंडमध्ये गेलेल्या या मराठी शिष्टमंडळाला तिथं अपयशाला सामोरे जावे लागले होते. तिथे पैशाची देखील कमतरता भासू लागली होती. दरम्यान, रंगो गुप्ते यांनी इथे 14 वर्षे काढली. यात त्यांना जरी अपयश आले असले तरी, त्यांचा पराक्रम वाखाणण्याजोगा होता. छत्रपती प्रतापसिंहराजे, प्रबोधनकार ठाकरे अथवा इतिहासाच्या पाने चाळताना शिर्के यांच्याबाबतचे लिखाणातही फारसे दाखले आढळत नाहीत, असे इतिहासतज्ञ सांगतात.

काय सांगता! सतत गोड खाल्ल्याने मेंदूवर होतो परिणाम? या आहेत वाईट सवयी.. 

स्वराज्याच्या पराक्रमात शिर्के घराण्याचं मोठं योगदान आहे. छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले यांच्या आदेशानुसार, महाराष्ट्रातून सर्वप्रथम ब्रिटनला जाणारे व्यक्ती म्हणून रंगो बापूजी गुप्ते आणि भोर संस्थानचे पंतसचिव भगवंतराव पंडित यांचे नाव घेतले जाते. मात्र, त्यापूर्वी सेनापती यशवंतराव शिर्के हे साताराहुन इंग्लंडला जाऊन पोहचले होते, असे काही दाखले प्रतापसिंहराजेंच्या लिखाणात आढळतात. पाच सप्टेंबर 1839 ला याच यशवंतरावांना महाराजांनी त्यांना गादीवरून हटवल्याचे दाखलेही उपलब्ध आहेत. लंडनला गेलेल्या शिष्टमंडळासोबत एक मुस्लिम गृहस्थही होते. या शिष्टमंडळास लंडनला फारसे यश प्राप्त झालं नाही, त्यामुळे त्यांना अपयशी माघारी परतावं लागलं होतं. 

इतिहासतज्ञ संभाजीराव पाटणे.


जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे.., वाचा 'तिच्या' विषयी 

Edited By : Siddharth Latkar

Web Title: First Marathi Person Who Went London Was Sent Satara Chhatrapati Pratapsinghraje

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top