चालकाला लुटणाऱ्या पाच जणांना अटक; शेंद्र्यातील गुन्हा 48 तासांत उघडकीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चालकाला लुटणाऱ्या पाच जणांना अटक

चालकाला लुटणाऱ्या पाच जणांना अटक; शेंद्र्यातील गुन्हा 48 तासांत उघडकीस

सातारा : शेंद्रे (ता. सातारा) येथे जीपचालक व क्लिनरच्या डोळ्यात चटणी पूड टाकून मोबाईलसह ५२ हजार ६०० रुपये लंपास केल्याच्या दरोड्याच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) अवघ्या ४८ तासांत पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरलेला ऐवज जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा: राज्य सीआयडी परमबीर सिंहांना फरार घोषित करण्याच्या तयारीत ?

सचिन रावसाहेब पवार (वय २५), सोमनाथ गोपीनाथ गायकवाड (वय २३, दोघे रा. सदाफुलेवस्ती-जामखेड, जि. नगर), गोविंद वासुदेव घुमरे (वय २४, रा. पारगाव-शिरस, ता. बीड), शिवाजी महादेव अडागळे (वय ३३, रा. वनवासवाडी. ता. सातारा, मूळ रा. पाथरुड, ता. भूम), दशरथ भुजंग क्षीरसागर (वय ३२, रा. प्रतापसिंहनगर, सातारा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

सोमवारी (ता. ८) पहाटे साडेतीनच्या सुमारास शेंद्रे हद्दीतील उड्डाणपुलाच्या खाली तीन दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी जीप चालकाला अडविले. त्यानंतर त्याच्या व क्लिनरच्या डोळ्यात चटणी पूड टाकून मोबाईल व गाडीतील ५२ हजार ६०० रुपये लंपास केले होते. याबाबत विनायक हाके (वय ३०, रा. बोरगाव, ता. वाळवा) यांनी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा: महाराष्ट्रात चार दिवस पुन्हा पाऊस...हवामान विभागाचा इशारा

गुन्ह्याचे गंभीर स्वरूप पाहता पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल व अतिरिक्त अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर एलसीबीचे निरीक्षक किशोर धुमाळ व सहायक निरीक्षक रमेश गर्जे यांना तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. श्री. गर्जे, उपनिरीक्षक मदन फाळके व अन्य कर्मचाऱ्यांचे तपास पथक तयार करण्यात आले. या पथकाने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली तसेच गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळवली. त्यानुसार साताऱ्यातील एकाने जामखेड, नगर, बीड व उस्मानाबाद येथील साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे समोर आले. त्यानंतर माहिती घेत सर्व संशयितांना अटक करण्यात आली. पुढील तपासासाठी त्यांना तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

कारवाईतील सहभागी अधिकारी व कर्मचारी

सहायक निरीक्षक रमेश गर्जे, उपनिरीक्षक गणेश वाघ, मदन फाळके, सहायक फौजदार उत्तम दबडे, तानाजी माने, हवादार कांतीलाल नवगणे, विश्वनाथ सपकाळ, आतिश घाडगे, संतोष पवार, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, मंगेश महाडिक, साबीर मुल्ला, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे आदींसह अन्य कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

loading image
go to top