निकृष्ट कठड्यांमुळेच पाच जणांचा मृत्यू; राष्ट्रीय महामार्गावरील दर्जाहीन कामावर पुन्हा प्रश्नचिन्ह!

संतोष चव्हाण | Sunday, 15 November 2020

गेल्या वर्षी नीरा नदीवरील दोन्ही पुलांमध्ये संरक्षक कठडा नसल्याने कार नदीपात्रत कोसळून चार जणांना आपला जीव गमवावा लागलेला होता. यानंतर महामार्ग रस्ते विकास महामंडळास जाग आली आणि पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या सर्व पुलांचा सर्व्हे करून दोन्ही पुलांमध्ये असणाऱ्या रिकाम्या जागेवर संरक्षक कठडे बसवले होते; परंतु हे संरक्षक कठडे बसवताना कोणतीही काळजी घेण्यात आली नसल्याचे समोर येत आहे.

उंब्रज (जि. सातारा) : गावाच्या हद्दीत असणाऱ्या तारळी नदीच्या दोन पुलांमधील निकृष्ट, दर्जाहीन संरक्षक कठडा नायर कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे सकृतदर्शनी दिसून आले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील दर्जाहीन कामामुळे आजवर अनेक दुचाकी आणि चारचाकी प्रवास करणाऱ्या नागरिकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. काल झालेल्या अपघाताने यावर शिक्कामोर्तब केला आहे. 

गेल्या वर्षी नीरा नदीवरील दोन्ही पुलांमध्ये संरक्षक कठडा नसल्याने कार नदीपात्रत कोसळून चार जणांना आपला जीव गमवावा लागलेला होता. यानंतर महामार्ग रस्ते विकास महामंडळास जाग आली आणि पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या सर्व पुलांचा सर्व्हे करून दोन्ही पुलांमध्ये असणाऱ्या रिकाम्या जागेवर संरक्षक कठडे बसवले होते; परंतु हे संरक्षक कठडे बसवताना कोणतीही काळजी घेण्यात आली नसल्याचे समोर येत आहे. राष्ट्रीय महामार्गावरील पुलांमध्ये बसवण्यात आलेले संरक्षक कठडे हे मजबूत किती आहेत, त्यात वापरण्यात आलेले साहित्य कोणत्या दर्जाचे वापरले आहे, अशा अनेक त्रुटी असल्याने या कठड्यांबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. काल झालेल्या अपघातात संरक्षक कठड्यांचा सिंमेटचा गठ्ठाच बससोबत खाली कोसळला आहे. यामुळे संरक्षक कठड्यांमध्ये कोठेही सळई आढळून येत नाही. यामुळे घटनास्थळावर संरक्षक कठड्यांच्या दर्जाबाबत अनेक शंका नागरिकांनी उपस्थित केल्या आहेत, तसेच संरक्षक कठडा मजबूत असता तर मिनी बस कठड्याला धडकून नायर कुटुंबातील पाच जणांचा जीव वाचला असता अशी चर्चाही घटनास्थळी सुरू होती. 

साहेब, माझं बाळ कुठे आहे?; अपघातग्रस्त आईच्या हंबरड्याने अनेकांना अश्रू अनावर

रस्ते विकास महामंडळाला जाग येणार?
 
अपघातामुळे रस्ते विकास महामंडळाच्या दर्जाहीन कामाबाबत नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. आता तरी संबंधित विभागास जाग येणार का? अजून किती कुटुंबांचा जीव दर्जाहीन कामामुळे घेतला जाणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे