तहसीलदार बाई मानेंचा धडाका; वाळूचोरांकडून साडेचार कोटींचा दंड वसूल

रुपेश कदम | Friday, 27 November 2020

एखाद्या गावात वाळू उत्खनन व वाहतूक होत असेल तर त्याबाबत कारवाई करण्याची जबाबदारी गावस्तरावर सरपंच, तलाठी, पोलिस पाटील व कोतवाल यांच्यावर निश्‍चित करण्यात आली आहे.

दहिवडी (जि. सातारा) : माणमध्ये अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी तहसीलदार बाई माने यांनी पुढाकार घेतला आहे. प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गौण खनिज साठा व वाहतूक करणाऱ्यांवर गेल्या नऊ महिन्यांत तब्बल चार कोटी 57 लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. महसूल विभागाकडून वाळूचोरांच्या मुसक्‍या आवळण्याचे काम सुरू असून धडक कारवायांमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
 
माण तहसील कार्यालयाकडून एप्रिल ते 31 ऑक्‍टोबरपर्यंत अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर कारवाई करून एक कोटी 20 लाख 86 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यापैकी आजअखेर 15 लाख 77 हजारांची वसुली झाली आहे. उर्वरित एक कोटी पाच लाख आठ हजार वसूल करण्यासाठी नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दहा जणांना स्थावर मालमत्ता जप्तीचे आदेश देण्यात आले असून त्यांच्या जमिनीवर बोजा चढविण्यात आला आहे. 21 व्यक्तींवर लेखी नोटिशीची कारवाई करण्यात आली आहे. काहींच्या हिश्‍श्‍याच्या जमिनीच्या लिलावाची कार्यवाही करण्यात येणार आहे. आजअखेर कारवाई केलेल्या अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या 28 वाहनांची माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास देण्यात आली आहे.
 
सातारा-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेडकडून (हैदराबाद) दोन कोटींची वसुली केली आहे. माणमध्ये सुरू असलेल्या शासकीय कामातून रॉयल्टीपोटी 2 कोटी 13 लाख 80 हजार रुपयांची वसुली झाली आहे.

खेळ मनाचा... दुःखी की आनंदी जीवनाचा? 

ऑक्‍टोबर व नोव्हेंबर महिन्यात माणमधील अवैध व विनापरवाना वाळूसाठा केलेल्या ठिकाणांचे पंचनामे करून नियमानुसार दंडात्मक नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यात 81.50 ब्रासचा पंचनामा करून 28 लाख 14 हजार 846 रुपयांची दंडात्मक नोटीस देण्यात आली आहे. तालुक्‍यातील 18 स्टोन क्रशरपैकी 12 अनाधिकृत स्टोन क्रेशर हे चार नोव्हेंबरपासून बंद करण्यात आले आहेत. गाढवाच्या साह्याने गौण खनिज, मुख्यत: वाळू वाहतूक करणाऱ्यांवरसुध्दा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदारांनी संबंधित तलाठ्यांना दिले आहेत. 

Advertising
Advertising

ग्रामस्तरीय दक्षता समितीवर जबाबदारी
 
एखाद्या गावात वाळू उत्खनन व वाहतूक होत असेल तर त्याबाबत कारवाई करण्याची जबाबदारी गावस्तरावर सरपंच, तलाठी, पोलिस पाटील व कोतवाल यांच्यावर निश्‍चित करण्यात आली आहे. त्यानुसार गावस्तरावरील ग्रामस्तरीय दक्षता समितीने गावात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करताना वाहन आढळून आल्यास त्यांनी कारवाईच्या दृष्टीने पावले उचलून तसा अहवाल तालुकास्तरीय समितीस कळवावा, असे आवाहन तहसीलदार बाई माने यांनी केले आहे.

मानलं भावांनो! जिवलग मित्राच्या निराधार कुटुंबाला मैत्रीचा आधार, वर्गणी काढून हलका केला कुटुंबावरील भार

Edited By : Siddharth Latkar