व्यवहारात फसवणूकप्रकरणी साताऱ्यातील एजंटावर गुन्हा

उमेश बांबरे | Saturday, 19 September 2020

साताऱ्यातील जुनी वाहने खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या सुरज कांबळे याच्यासोबत गाडी विकण्याबाबत बोलणे झाले होते. त्यानुसार सुरज कांबळेने सप्टेंबर 2019 रोजी पुणे येथे जाऊन अलोक यास 30 हजार रुपये देऊन कार घेऊन सातारा येथे आला. त्यानंतर पार्थ पोळके हे सुरज कांबळे याच्याकडे कारचे पैसे मागण्यासाठी वारंवार जात होते. परंतु, सुरज कांबळे पैसे देत नव्हता.

सातारा : कारची खरेदी-विक्री करणाऱ्या मध्यस्थाने साडेतीन लाखात व्यवहार होऊनही कार मालकाची एक लाख 70 हजाराची फसणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात सुरज कांबळे (रा. शुक्रवार पेठ, सातारा) या एजंटावर (मध्यस्थ) गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत जान्हवी पार्थ पोळके (रा. शाहूपुरी) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोळके यांचा मुलगा अलोक पोळके पुणे येथे नोकरीस असून, त्याच्याकडे कार देण्यात आली होती. ही कार साताऱ्यातील जुनी वाहने खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या सुरज कांबळे याच्यासोबत गाडी विकण्याबाबत बोलणे झाले होते. त्यानुसार सुरज कांबळेने सप्टेंबर 2019 रोजी पुणे येथे जाऊन अलोक यास 30 हजार रुपये देऊन कार घेऊन सातारा येथे आला. त्यानंतर पार्थ पोळके हे सुरज कांबळे याच्याकडे कारचे पैसे मागण्यासाठी वारंवार जात होते. परंतु, सुरज कांबळे पैसे देत नव्हता. त्यामुळे पोळके यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्याने पोळकेंना 50 हजार व त्यांच्या पत्नीकडे एक लाख घरी आणून दिले. 

Video : नगराध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप म्हणजे ''सौ चुहे खाकर..बिल्ली चली हज को'' 

मात्र, ही कार साडेतीन लाखांना विकल्याने उर्वरित एक लाख 70 हजार रूपये देण्यास तो टाळाटाळ करू लागला. तसेच गाडी विकत घेणारे अर्जुन कदम यांच्या नावावर करण्यासाठी फॉर्मवर मुळ मालकाच्या सह्या घेण्याऐवजी दुसऱ्याच कोणाच्यातरी सह्या घेतल्याचे पोळके यांच्या निदर्शनास आले. त्याबाबत त्यांनी सुरज कांबळे व त्याचे वडील राजेंद्र कांबळे यांना विचारणा केली. त्यावर त्यांनी काहीही बोलले नाहीत. त्यानंतर फिर्यादीच्या बॅंक खात्यात प्रथम 60 हजार व नंतर 60 हजार असे एकुण एक लाख 20 हजार रुपये जमा झाल्याचे दिसले. हे पैसे कोणी पाठविले, हे समजलेले नाही. तथापि, सुरज कांबळेकडे उर्वरित रक्कम मागितली असता, आजपर्यंत त्याने सदरची गाडीची उर्वरीत रक्कम रुपये दिलेली नसल्याचे जान्हवी पोळके यांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरुन सुरज कांबळे याच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे