
साखरवाडीत साडेसात लाखांची फसवणूक
फलटण शहर - शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास दुप्पट करण्याचे आमिष दाखवून सात लाख ६६ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी साखरवाडी (ता. फलटण) येथील एकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पांडुरंग दत्तात्रय चव्हाण असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, की होळ (ता. फलटण) येथील विश्वास जगन्नाथ भोसले यांची पांडुरंग चव्हाण यांच्याशी साखरवाडी येथील ग्राहकसेवा केंद्रात ओळख झाली. चव्हाण याने भोसले यांचा विश्वास संपादन करून त्यांना तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा, मी त्या पैशाची डबल रक्कम तुम्हाला करून देतो, असे सांगत गावातील बऱ्याच लोकांना दुप्पट रक्कम करून दिली आहे असे सांगितले.
भोसले यांनी चव्हाण याच्यावर विश्वास ठेऊन गुगल पेवरून १६ ऑगस्ट २०२१ ते १३ जानेवारी २०२२ या कालावधीत वेळोवेळी त्याच्या खात्यात एकूण सात लाख ६६ हजार ५०० रुपये भरले. चव्हाण याच्याकडून एकोणसाठ हजार १०० रुपये एवढाच शेअर मार्केटचा परतावा भोसले यांना मिळाला आहे.
उर्वरित रक्कम मागूनही ती देण्यात आली नाही. त्याचबरोबर मच्छिंद्र उत्तम मोरे, सचिन चंद्रकांत भाकरे (दोघेही रा. साखरवाडी, ता. फलटण) व बळिराम जयराम होडशिळ (रा. गितेवाडी, ता. जामखेड, जि. नगर), ऋषिकेश रामलिंग भांगे (रा. बीड) या ऊसतोड मजुरांचीही फसवणूक झाल्याचे समजत असल्याचे विक्रम भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी पांडुरंग चव्हाण यास अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे करीत आहेत.
Web Title: Fraud Of Rs 75 Lakh In Sakharwadi Phaltan
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..