esakal | 98 वर्षे जीवनाचा प्रवास करत असताना अनेक संकटं पाहिली, त्यातून मार्गही काढले; पण..

बोलून बातमी शोधा

Ganapati Jagdale-Patil
98 वर्षे जीवनाचा प्रवास करत असताना अनेक संकटं पाहिली, त्यातून मार्गही काढले; पण..
sakal_logo
By
विशाल गुंजवटे

सातारा : कोरोनाचा जप गावात व घरात रोजच सर्वांच्या तोंडी असायचा. परिसरातील अनेक व्यक्ती कोरोनाने गेलेल्या माहितीही मिळायची. आपले वय एक तर 98 वर्षे, या वयात जर आपल्याला कोरोना (Corona) झाला तर आपण वाचू शकत नाही, असे विचार मनात यायचे. नकळतपणे मला हृदयविकाराचा पहिला झटकाही आला. घरच्यांनी तातडीने दवाखान्यात नेऊन उपचार केले. त्यातून बचावल्याचे समाधान होते. पण, काय माहीत पुढच्याच आठवड्यात आपल्यावर मोठे संकट येणार आहे. (Ganapati Jagdale-Patil Of Rajwadi Defeated Coronavirus Satara News)

काळजी घेऊनही कोरोनाने आठवडाभरातच गाठले. रिपोर्टनंतर कळालं की "आरटीपीसीआर'चा स्कोर 14 आलाय. नातू दत्ता गायकवाड याने त्वरित बेडसाठी पळापळ केली. पण, ऑक्‍सिजनचा बेड काही मिळत नव्हता. मला सर्व जण धीर देऊन "काय होत नाही, निवांत राहा', असे सांगत होते. मीपण वरून धीट आहे, अस दाखवत होतो. मात्र, आतून थोडीशी घबराट होत होती. या वयात कोरोना झालाय म्हटल्यावर परतीची चिंता वाटू लागली. त्यातून असं वाटायचे की आपण तर खूप जगलोय, आता काय मृत्यूने गाठले तर गाठले. मात्र, या कोरोनापुढे सहजासहजी हार मानायची नाही, या उमेदीने व जिद्दीने कोरोनाला सामोरे जायचे ठरवले. खासगी कोविड सेंटरला मला दाखल करण्यात आले. वेळेवर उपचार झाल्याने व माझ्या शरीराने पण उपचाराला चांगली साथ दिल्याने मी वयाच्या 98 व्या वर्षी कोरोनावर मात केली.

'रुग्णांची सेवा करणारे हॉस्पिटल केवळ हॉस्पिटल नसून ते एक पवित्र मंदिर आहे'

कोविड सेंटरचे सर्व डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन माझा सत्कार करत मला सेंटरमधून निरोप दिला. कोरोनाला हरवून सुखरूपपणे घरी आलो असून आता मी ठणठणीत बरा आहे. 98 वर्षे जीवनाचा प्रवास करत असताना अनेक संकटे पाहिली व त्यातून मार्गही काढले. मात्र, या कोरोनाचे संकट भलतेच जीवघेणे. आमच्या वयाच्या निम्म्यापेक्षा कमी वयाचे तरुण डोळ्यासमोर जाताना पाहिले. चांगली माणसं या कोरोनानं हिरावून नेली. पण, सर्वांना माझं एकच सांगणं आहे, की आपण जन्माला आलोय म्हणजे मृत्यूही एक ना एक दिवस ठरलेला आहेच. त्यामुळे कोरोनाला न भीता सामोरे जावा. भीतीने त्याला बळी पडू नका. थोडा फार त्रास होईल. पण, आपल्या मनाशी खूणगाठ बांधा की आपल्याला या कोरोनाला कोणत्याही परिस्थितीत हरवायचं आहे. ही मानसिकता सर्व कोरोनाबाधितांनी ठेवली तर कोरोना नक्कीच पळून जाईल, असा विश्वास राजवडीच्या गणपत जगदाळे-पाटील यांनी व्यक्त केला.

Ganapati Jagdale-Patil Of Rajwadi Defeated Coronavirus Satara News