esakal | Satara : पेट्रोल वाढले; रिक्षाचे भाडे डाउनच
sakal

बोलून बातमी शोधा

auto riksha

पेट्रोल वाढले; रिक्षाचे भाडे डाउनच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : पेट्रोलचे दर ११० रुपयांवर पोचल्यामुळे साताऱ्यासह इतर भागातील रिक्षांचे मीटर डाउन असून, तोंडीभांडी भाडे ठरवत प्रवाशांची ने-आण करण्‍यावर रिक्षाचालकांचा जोर आहे. तोंडीभांडी भाड्यामुळे सर्वसामान्‍यांच्‍या खिशावर ताण पडत असून, यातून तोडगा काढण्‍यासाठी रिक्षाचे भाडेपत्रक पुन्‍हा नव्‍याने ठरविण्‍याची मागणी रिक्षाचालकांकडून होत आहे.

हेही वाचा: ‘लखीमपूर’च्या निषेधार्थ आज महाराष्ट्र ‘बंद’

कोरोनाचा प्रसार रोखण्‍यासाठी पुकारलेला तीन महिन्‍यांचा लॉकडाउन मागे घेतल्‍यानंतरही शासनाने खासगी प्रवासी वाहतूक बंद ठेवली होती. कोरोनाचा प्रसार कमी होऊ लागल्‍यानंतर काही प्रमाणात सध्‍या सर्वत्र खासगी प्रवासी वाहतूक सुरू आहे. तीनपेक्षा जास्‍त प्रवासी रिक्षात न घेण्‍याचे बंधन असल्‍याने आपसुकच रिक्षाचालकांनी शहरांतर्गत सुरू असणाऱ्या वाहतुकीत पाच ते दहा रुपयांची वाढ केली होती. ही वाढ सोसत सातारकरांचा रिक्षातून प्रवास सुरू असतानाच पेट्रोलच्‍या दराने शंभरी ओलांडली. सध्‍या सातारा शहर आणि परिसरातील पेट्रोलचा दर ११० रुपयांच्‍या घरात ठाण मांडून बसला आहे.

पेट्रोलचे दर वाढल्‍याने तसेच प्रवासी संख्‍येचे बंधन असल्‍याने रिक्षाचालकांना खर्च आणि उत्‍पन्न याचा ताळमेळ घालण्‍यासाठी आपसुकच स्‍वघोषित दरवाढ करावी लागली. ही दरवाढ करत असतानाच मीटर डाउन ठेवत बस स्‍थानक, पोवई नाका तसेच इतर ठिकाणांहून तोंडीभांडी भाडे ठरवत प्रवासी वाहतुकीवर त्‍यांनी जोर दिला. सध्‍या राजवाडा ते बस स्‍थानकादरम्‍यानच्‍या प्रवासासाठी काही रिक्षाचालक माणसी २० रुपयांच्‍या घरात भाडे आकारत आहेत. शहरांतर्गत बससेवा पूर्ण ताकदीने सुरू नसल्‍याने अनेकांना अंतर्गत प्रवासासाठी यामुळे रिक्षाचाच आधार घ्‍यावा लागत आहे. बस स्‍थानकाजवळून शाहूपुरी तसेच इतर ठिकाणी जाण्‍यासाठी कमीत कमी १०० ते १२५ रुपयांच्‍या घरात भाडे आकारले जाते. कोणतेही ठोस भाडे आणि दरपत्रक नसल्‍याने या स्‍वघोषित दरवाढीचा फटका सर्वसामान्‍य सातारकरांना बसत आहे. यामुळे रिक्षाथांब्‍यावर प्रवासी रिक्षाचालक यांच्‍यात कुठे जायचे, किती देणार-किती घेणार, अशा संवादाच्‍या फैरी झडून वादाचे प्रसंग उद्‌भवत आहेत.

वाट बघतोय रिक्षावाला...दरवाढीची

प्रवासी क्षमतेवर मर्यादा असतानाच पेट्रोलच्‍या दरवाढीने रिक्षा व्‍यावसायिकांचे अर्थचक्र कोलमडून पडले आहे. दररोज लागणारे पेट्रोल आणि दिवसभर रिक्षा चालवून मिळणारे उत्‍पन्न याचा ताळमेळ घालण्‍यासाठी साताऱ्यासह परिसरातील सर्वच रिक्षाचालकांनी स्‍वघोषित दरवाढ केली आहे. ही दरवाढ सर्वसामान्‍यांना सुसह्य नसली तरी त्‍यापुढे रिक्षाचालकांचा नाईलाज आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वाढलेल्‍या पेट्रोल दराचा आढावा घेत कधी नवीन दरपत्रक जाहीर करते, याकडे बहुतांश रिक्षाचालकांची नजर लागून राहिली आहे.

"पेट्रोल दरवाढीमुळे रिक्षाचालकांचे कंबरडे मोडले असून, जुन्‍या दरानुसार वाहतूक केल्‍यास सर्वच धंदा तोट्यात येत आहे. यामुळे नाईलाजास्‍तव दरवाढ करावी लागत आहे. सर्वसामान्‍य प्रवाशांसह रिक्षाचालकांचा विचार करत वाढलेल्‍या पेट्रोलच्‍या तुलनेत नवीन दरपत्रक लागू करावे, यासाठी आम्‍ही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयास निवेदन देणार आहोत."

-दीपक पवार, जिल्‍हाध्‍यक्ष, सातारा जिल्‍हा रिक्षा, टॅक्‍सी संघटना

loading image
go to top