सकारात्मक विचार असेल, तर कोरोनाला हरवणे कठीण नाही : गिरीष शहा

आयाज मुल्ला | Wednesday, 30 September 2020

घरातील 12 लोक कोरोनाबाधित झाल्यानंतर आम्ही सर्वजण काहिसे हबकलो होतो. मात्र, या संकटकालीन स्थितीत सर्वांनी सकारात्मक मानसिकता ठेवत एकमेकांना आधार दिला. हॉस्पिटलमधील उपचार व आम्ही एकमेकांसह मित्रमंडळी, नातलगांनी दिलेल्या धीरामुळे आम्ही सर्वांनी कोरोनावर मात केल्याचे गिरीष शहा यांनी सांगितले.

वडूज (जि. सातारा) : रासायनिक खते, बी-बियाणे विक्री व्यवसायामुळे सर्व स्तरांतील ग्राहकांशी आमचा संबंध येतो. कोरोना आल्यापासून आम्ही नियमांचे पालन करत सर्व दक्षता घेतल्या. स्वत:सह ग्राहकांनाही मास्क, सॅनिटायझरचा वापर, दुकानात नित्य निर्जंतुकीकरण फवारणी, आयुर्वेदिक काढ्याचा वापर आदी दक्षता घेतल्या. मात्र, अचानक बंधू वैभव यांना चव न लागणे, थकवा येणे, ताप येणे असा त्रास जाणवू लागला. नंतर धाकटे बंधू सुहास यांनाही त्रास जाणवू लागला. त्यावर येथे डॉक्‍टरांकडे प्राथमिक उपचार घेतले. एक्‍सरे आदी चाचण्या केल्यानंतर कोरोनाची काही लक्षणे असल्याची शक्‍यता डॉक्‍टरांना जाणवली. त्यामुळे सातारा हॉस्पिटलमध्ये पुढील उपचार घेतले. कोविडची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर आम्ही सर्वांच्या टेस्ट घेतल्या, असे गिरीष शहा यांनी सांगितले. 

त्यात वयस्कर आईच्या रिपोर्टची चिंता वाटत होती. मात्र, आईचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर आम्ही सुस्कारा सोडत कोरोनावर मात करण्याची अर्धी लढाई तेथेच जिंकल्याचा आत्मविश्वास निर्माण झाला. आई आणि वैभव यांच्या पत्नीचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याने ते घरीच थांबले. तर घरातील तीन मुलांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह होते. मात्र, त्यांची ऑक्‍सिजन लेव्हल चांगली असल्याने तिघांना होम क्वारंटाइन केले. चुलत बंधू सुकुमार शहा, त्यांचे चिरंजीव मनीष व कुटुंबिय, माझी पत्नी तसेच बंधू वैभव, सुहास, त्यांची पत्नी असे आम्ही 12 जण सातारा हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या खोल्यांत उपचार घेत होतो. आम्ही एका ठिकाणी दाखल झाल्याने आम्ही एकमेकांना चांगला मानसिक आधार देऊ शकलो. त्याचा आम्हाला चांगला फायदा झाला. सर्व कुटुंबीयांमध्ये माझी शारीरिक स्थिती थोडी बिघडली होती. त्यामुळे सर्वजण मला चांगला आधार देत होते. 

पोटात वाढवलेलं बाळ मला कोरोनाशी झुंजायला बळ देत होतं!

शिवाय मित्रमंडळी, नातलगही फोन करून माझे मनोबल वाढवत होते. हॉस्पिटलमध्ये विशेषत: डॉ. सुरेश शिंदे यांच्या कन्या डॉ. शलाका शिंदे यांनी मुंबईत कोविडवर एक महिन्याचे विशेष उपचारांचे प्रशिक्षण घेतले होते. त्यांच्या उपचारांचा मोठा फायदा आम्हा कुटुंबीयांना झाला. काही दिवस उपचार घेतल्यानंतर नंतर आम्हाला डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी डॉक्‍टरांनी आम्हाला पुढील काही दिवस पथ्ये पाळण्यास सांगितली. पहिल्यापासून सुरू असणारा योगा, प्राणायाम सुरू ठेवले आहेत. डॉक्‍टरांकडून झालेले यशस्वी उपचार, कुटुंबीयांसह मित्रमंडळी, नातलगांनी दिलेला मोठा मानसिक आधार, सकारात्मक विचार यांमुळे कोरोनावर यशस्वीरित्या मात करू शकलो. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे