VIDEO : व्वा रं पठ्ठ्या! दुष्काळी पट्ट्यात शेतकऱ्याची 'विक्रमी' कामगिरी; झेंडूतून मिळवले तब्बल साडेपाच लाखांचे उत्पन्न

सल्लाउद्दीन चोपदार | Thursday, 19 November 2020

दुष्काळी माण तालुक्यातील भाटकी येथील गोरखतात्या शिर्के यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत जून महिन्यात गोल्ड स्पॉट या संकरीत जातीच्या झेंडूची दोन एकरातील सीताफळ बागेत अंतरपिक म्हणून लागवड केली. सुमारे पाच टन झेंडूच्या फुलांची विक्री करुन आतापर्यंत साडेपाच लाखांचे उत्पन्न शिर्केंनी मिळविले आहे.

म्हसवड (जि सातारा) : दुष्काळी माण तालुक्यातील भाटकी येथील गोरखतात्या शिर्के यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत जून महिन्यात गोल्ड स्पॉट या संकरीत जातीच्या झेंडूची दोन एकरातील सीताफळ बागेत अंतरपिक म्हणून लागवड केली आहे.

विजया दशमी व दीपावलीस बाजारपेठेत झेंडूच्या फुलांची मागणी अधिक असते. यंदाच्या या दोन्ही सणास शंभर ते एकशे दहा रुपये किलो दराने सुमारे पाच टन झेंडूच्या फुलांची विक्री करुन आतापर्यंत साडेपाच लाखांचे उत्पन्न मिळविले आहे. यापुढेही आणखी सहा ते सात लाखांचे खात्रीशीपणे उत्पन्न मिळेल, असा ठाम आत्मविश्वास गोरखतात्या शिर्के यांनी व्यक्त केला. शिर्के यांची म्हसवड पासून पाच किलोमीटर अंतरावरील भाटकी या गावी पंधरा एकर शेती आहे. या शेतीत ते गहू, बाजरी, मका, ज्वारी, हरभरा व उसाचे पारंपरिक पिके घेत असतात.

व्वा! क्या बात है.. नेता हो तो ऐसा; रोहित पवारांच्या मदतीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Advertising
Advertising

शिर्केंनी गेल्या जून महिन्यात दोन एकरात सीताफळांच्या रोपाची लागवड केली व त्यामध्येच नर्सरीतून सुमारे ३६ हजार गोल्ड स्पॉट झेंडूच्या रोपांची लागवड प्लॅस्टिकचे मल्चिन पेपर अंधरुन केली व ठिंबक सिंचन केले. योगा-योगाने यंदा झेंडूच्या फुलांचे बाजारपेठेत भाव वाढल्यामुळे या संधीचा अचूक फायदा श्री. शिर्के यांना झाला व झेंडूच्या फुलांच्या विजया दशमी व दीपावली सणाच्या कालावधीत केलेल्या दोन तोड्यातच सुमारे साडेपाच लाखांचे उत्पन्न हाती मिळाले. यापुढील काळातही पाच ते सहा लाखांचे उत्पन्न निश्चितपणे मिळू शकेल. शेतक-यांनी पारंपरिक शेतीस बगल देऊन फुल शेतीकडेही लक्ष दिले, तर निश्चितपणे खात्रीशीर उत्पन्न हाती लागते, असा दावाही शिर्के यांनी केला आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे