विधान परिषद आमदारांच्या नियुक्त्यांबाबत राज्यपालांनी घटनेचा आदर करावा : पृथ्वीराज चव्हाण

गिरीश चव्हाण | Monday, 16 November 2020

राज्यपाल हे घटनात्मक पदावर विराजमान आहेत. घटनेने चौकट बांधून दिल्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेणे आवश्‍यक आहे. राजकीय नेते मंडळींनी काहीही सांगितले तरी राज्यपालांनी घटनेचा आदर करत नियुक्‍त्या घोषित कराव्यात असे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केले.

सातारा : राज्य घटनेतील तरतुदींनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळाने विधान परिषदेतील 12 आमदार नियुक्‍त करण्यासाठीची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्याकडे पाठवली आहे. राज्यपाल हे घटनेचा आदर राखत त्यावर निर्णय घेतील. राजकीय नेते मंडळींनी काहीही सांगितले तरी राज्यपाल यात राजकारण करणार नाहीत, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे व्यक्त केले.
 
पुणे पदवीधर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. विधान परिषदेवर नियुक्‍त करायच्या 12 जणांच्या नावांची घोषणा करण्यास राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्याकडून विलंब होत असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, ""राज्य घटनेप्रमाणे विधान परिषदेमध्ये आमदार नियुक्‍त करण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळास असतो किंवा तशी शिफारस ते करू शकतात.

अमेरिका, रशिया पुढं झुकायचं नाही, हे नेहरूंच धोरण; परराष्ट्रवरुन चव्हाणांचे मोदींवर टीकास्त्र

राज्यघटनेने दिलेल्या अधिकारानुसार मुख्यमंत्र्यांनी 12 जणांच्या नावाची यादी शिफारशीसह राज्यपालांकडे पाठवली आहे. राज्य घटनेतील संकेतानुसार राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या शिफारशीचा आदर करणे आवश्‍यक आहे. 12 जणांच्या नावांची घोषणा करण्यास उशीर झाल्यास त्यात काही तरी राजकारण करण्यात येतेय, असा चुकीचा संदेश जाऊ शकतो. राज्यपालांना राजकारण करायचे नाही. राज्यपाल हे घटनात्मक पदावर विराजमान आहेत. घटनेने चौकट बांधून दिल्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेणे आवश्‍यक आहे. राजकीय नेते मंडळींनी काहीही सांगितले तरी राज्यपालांनी घटनेचा आदर करत नियुक्‍त्या घोषित कराव्यात.''

Edited By : Siddharth Latkar