'वरुण'ची जागा घेणार 'फुले राजमा'; भविष्यात क्षेत्र वाढण्याचा कयास

'वरुण'ची जागा घेणार 'फुले राजमा'; भविष्यात क्षेत्र वाढण्याचा कयास

कोरेगाव (जि. सातारा) : घेवड्याचा वरुण वाण विकसित होऊन स्थिरावलाही. मात्र, "वरुण'च्या तुलनेत अद्यापही मूळ वाघा घेवडाच सरस ठरत आहे. या पार्श्वभूमीवर मूळ वाघा घेवड्याला टक्कर देऊ शकणारा, खरीप व रब्बी या दोन्ही हंगामामध्ये लागवड होऊ शकणारा "फुले राजमा' हा नवीन वाण घेवडा उत्पादकांना आकृष्ट करू लागला असून, मूळ वाघ्याच्या तुलनेत दीडपट, दुप्पट उत्पादन देऊ शकणाऱ्या फुले राजमाचे क्षेत्र आगामी काळात वाढतच राहील, असा कयास बांधला जात आहे. 

उत्तर भारतामध्ये राजमा या नावाने प्रसिद्ध असलेल्या घेवड्याची मोठी बाजारपेठ आहे. कोरेगाव तालुक्‍यामध्ये विशेषतः तालुक्‍याच्या उत्तर भागात आणि खटावच्या पश्‍चिमेकडील काही गावांत घेवड्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कोरेगाव, खटाव या दोन्ही भागांमध्ये मिळून सुमारे 20 हजार हेक्‍टरवर घेवड्याची पेरणी केली जाते. विशिष्ट भौगोलिक परिस्थिती व वातावरणामुळे या भागात पिकणाऱ्या घेवड्याला वेगळी गुणवत्ता आणि चव असल्याने उत्तर भारतीय बाजारपेठेमध्ये तो कोरेगावचा राजमा म्हणून प्रसिद्ध आहे. प्रामुख्याने खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या घेवड्याच्या या पिकाला जेमतेम पाऊस पोषक ठरतो. कमी किंवा अधिक पाऊस झाल्यास या पिकाचे नुकसान होते. या पार्श्वभूमीवर पारंपरिक वाघा घेवडा या वाणाला पर्याय ठरू शकणारा आणि कमी किंवा अधिक पावसामध्ये तग धरून अधिक उत्पादन देणारा "वरुण' हा विकसित वाण काही वर्षांपूर्वी उपलब्ध झाला आहे. 

आता आणखी संशोधन झाले असून, त्यानुसार विकसित झालेल्या "फुले राजमा' या सुधारित वाणाचे बीजोत्पादन गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात करंजखोपसह तालुक्‍याच्या उत्तर भागातील काही गावांमध्ये घेण्यात आले. परिणामी स्थानिक पातळीवर फुले राजमाचे बियाणे या वर्षीच्या खरिपामध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध झाले. आता यंदाच्या रब्बीमध्येही या नवीन वाणाच्या पेरणीची तयारी उत्तर भागातील शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. त्यामुळे फुले राजमाचे क्षेत्र आणि उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. या वाणाचा रंग उठावदार, आकारमान व लांबी मोठी असून, हा रोगाला बळी पडत नाही. मूळ वाघा घेवड्याला एकरी सहा ते सात क्विंटल उतार (उत्पादन) पडतो, तर गेल्या रब्बीमध्ये फुले राजमाचा उतार एकरी 12 क्विंटल पडल्याचा कोरेगावच्या उत्तर भागातील शेतकऱ्यांचा अनुभव आहे. सध्या मूळ वाघा घेवड्याचे लागवडीखालील सरासरी क्षेत्र 15 ते 20 टक्के एवढे आहे. उर्वरित क्षेत्र "वरुण'ने व्यापले आहे. आता वरुणची जागा फुले राजमा घेऊ शकतो, असा कयास बांधला जात आहे. 

दरातही वाघ्याची बरोबरी 

या हंगामात वरुणला सरासरी 45 ते 55 रुपये प्रतिकिलो एवढा दर मिळाला. वाघा घेवड्याला प्रतिकिलोला सरासरी 58 पासून 65 रुपयांपर्यंत दर मिळाला. या पार्श्वभूमीवर दराच्या बाबतीत फुले राजमाने वाघा घेवड्याची बरोबरी साधली आहे. याशिवाय फुले राजमाला दीडपट, दुप्पट उतार मिळत असल्याने उत्पन्नातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, अशी माहिती कोरेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संताजी यादव यांनी दिली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com