नीरा नदीच्या पात्रातून सांगोला तालुक्यातील एकास वाचविण्यात यश

किरण बाेळे | Friday, 16 October 2020

शहरात दत्तमंदिर परिसराची मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी पाहणी केली. त्यावेळी त्यांच्यासमवेत भाऊ कापशे, नगरसेविका प्रगती कापसे, दीपाली निंबाळकर, नगरसेवक अशोकराव जाधव, पांडुरंग गुंजवटे, किशोरसिंह निंबाळकर, राहुल निंबाळकर आदी उपस्थित होते.

फलटण शहर : फलटण शहर व तालुक्‍यात गेल्या 24 तासांत पावसाने झोडपून काढले. पावसामुळे नदी, ओढे, नाले तुडुंब भरून वाहिल्याने अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. ओढ्यावरील पुलावरून पाणी वाहिल्याने काही प्रमुख मार्गावरील वाहतूक रात्रभर ठप्प होती. पावसामुळे अनेक ठिकाणी घरे, शेतपिके, पूल, साकव यांचे मोठे नुकसान झाले आहे.
 
बाणगंगा धरण पूर्ण भरून नदीवरील सर्व 29 बंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. नदी क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने बाणगंगा नदीसह तालुक्‍यातील छोटे-मोठे ओढे, नाले, ओहोळ यांनाही पूर आला. शहरातील नदीलगत असलेल्या शनीनगर येथील घरामध्ये पाणी घुसल्याने येथील नागरिकांचे हाल झाले. मलठणला जोडणारे दत्त मंदिर पूल व सद्‌गुरू हरिबुवा महाराज मंदिर पुलांचेही नुकसान झाले आहे. येथून मालवाहतूक करणारा छोटा टेम्पोही पाण्यात वाहून गेला.

मिरजेत झोपडपट्ट्यांत शिरले पाणी; शेकडो जणांचे स्थलांतर  

फलटण-पंढरपूर रस्त्यावर विडणी येथे व फलटण-दहिवडी रस्त्यावर भाडळी बुद्रुक येथील ओढ्यावरील पुलावरून पाणी वाहिल्याने या प्रमुख मार्गांवरील वाहतूक रात्रभर ठप्प होती. फलटण-सातारा मार्गावर घाडगेवाडी येथील ओढेही तुडुंब भरून वाहिल्याने या मार्गावरील वाहतूकही रात्रभर बंद होती. येथीलच पुलावरून पाणी वाहत असतानाही दुचाकीवरून ओढा ओलांडण्याचा प्रयत्न करताना एका दुचाकीसह त्यावरील दोघे जण वाहून गेले. परंतु, ते दोघेही पाण्याबाहेर येण्यात यशस्वी ठरले. आदर्की परिसरातील सासवड-हिंगणगाव, कापशी-हिंगणगाव हे रस्तेही पावसाने खचले आहेत.

सांगली जिल्ह्यात पावसामुळे तिघेजण गेले वाहून 

सासकल येथील ओढ्यावर असलेल्या एका पुलाचा काही भाग वाहून गेला आहे. तसेच सासवड ते हिंगणगाव या रस्त्यावरील वाहतूक रात्रभर बंद होती. जावली व आंदरुड गावच्या परिसरात काही घरांच्या भिंती पावसामुळे कोसळल्या आहेत. पावसाने या परिसरातील मका व कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. कांबळेश्वर येथे नीरा नदीच्या पात्रात असलेल्या भिवाई देवीच्या मंदिरास नीरा नदीतील पुराच्या पाण्याने वेढल्याने या मंदिरात कालपासून अडकलेल्या गौंडवाडी (ता. सांगोला) येथील गोरख नामदेव शेंडगे या 55 वर्षीय भाविकास दुपारी तीनच्या सुमारास विशेष रेस्क्‍यू ऑपरेशनद्वारे सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले.
 
शहरात दत्तमंदिर परिसराची मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी पाहणी केली. त्यावेळी त्यांच्यासमवेत भाऊ कापशे, नगरसेविका प्रगती कापसे, दीपाली निंबाळकर, नगरसेवक अशोकराव जाधव, पांडुरंग गुंजवटे, किशोरसिंह निंबाळकर, राहुल निंबाळकर आदी उपस्थित होते.

परतीचा तडाखा! सातारा जिल्ह्यात दीड हजार हेक्‍टर पिकांचे नुकसान