पशुखाद्याच्या दरवाढीने शेतकरी हतबल; जनावरांचा खर्चही आवाक्‍याबाहेर, खर्चात बसेना ताळमेळ

हेमंत पवार
Friday, 4 December 2020

शेतकरी घरखर्च चालावा म्हणून जनावरांचे संगोपन करतात. जिल्ह्यातील जनावरांची संख्याही लाखाच्या घरात आहे. मात्र, जनावरे सांभाळणे आता शेतकऱ्यांच्या आवाक्‍याबाहेर जाऊ लागल्याचे चित्र आहे. जनावरांसाठी शेतकऱ्यांना शेतातून चारा आणावा लागतो. त्या ओल्या चाऱ्यावर जनावरांच्या दुधाची फॅट लागत नाही. त्यामुळे पूरक म्हणून जनावरांना अन्य खाद्य द्यावे लागते. त्यासाठी शेतकरी विकत खाद्य घेतात. मात्र, या खाद्यनिर्मिती उद्योगालाही मध्यंतरीच्या अतिवृष्टीचा फटका बसला आहे.

कऱ्हाड (जि. सातारा) : शेतकऱ्यांचा घरखर्च चालणाऱ्या पशुपालनावरही विविध प्रकारचे आघात होऊ लागले आहेत. सध्या जनावरांच्या खाद्याच्या दरात किलोमागे चार ते सहा रुपये दरवाढ झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. जनावरे सांभाळण्याचा खर्चही आता आवाक्‍याबाहेर जाऊ लागल्याने शेतकऱ्यांपुढे ती विकण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. 

शेतकरी घरखर्च चालावा म्हणून जनावरांचे संगोपन करतात. जिल्ह्यातील जनावरांची संख्याही लाखाच्या घरात आहे. मात्र, जनावरे सांभाळणे आता शेतकऱ्यांच्या आवाक्‍याबाहेर जाऊ लागल्याचे चित्र आहे. जनावरांसाठी शेतकऱ्यांना शेतातून चारा आणावा लागतो. त्या ओल्या चाऱ्यावर जनावरांच्या दुधाची फॅट लागत नाही. त्यामुळे पूरक म्हणून जनावरांना अन्य खाद्य द्यावे लागते. त्यासाठी शेतकरी विकत खाद्य घेतात. मात्र, या खाद्यनिर्मिती उद्योगालाही मध्यंतरीच्या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल खरीप हंगामातील पिकांतून मिळतो. त्यामुळे पशुखाद्याचे दरही नियंत्रणात राहतात. मात्र, मागील वर्षीच्या महापुरात खरिपातील पिके वाया गेली. त्यामुळे मागील वर्षी खाद्याच्या दरात वाढ झाली.

दलालांपासून वाचण्यासाठी मार्केटला माल नेणे गरजेचे : तानाजी चौधरी
 
त्यानंतर खाद्य तयार करण्यासाठीचा कच्च्या मालाच्या किमती खाली आल्यामुळे पशुखाद्याचे दर कमी झाले. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. परंतु, पशुखाद्याचे दर काही काळच स्थिर राहिले. त्यानंतर दरात चढ-उतार होऊ लागले. त्यामुळे दूध उत्पादकांना पशुखाद्य दरात वाढ होत असल्याने आर्थिक फटका बसू लागला. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदा अतिवृष्टी झाली. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. परिणामी, शेती उत्पादनात घट झाली. त्यामुळे खाद्य तयार करण्यासाठी लागणारा कच्च्या मालावरही त्याचा परिणाम झाला. परिणामी कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाली. त्यामुळे नाईलाजाने उत्पादकांना खाद्याच्या दरात वाढ करावी लागली आहे. त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच कोलमडल्यासारखी स्थिती झाली आहे. 

खटाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा आंतरपिके घेण्याकडे कल; बटाटा, कांदा, वाटाण्याला सर्वाधिक पसंती

काहींचा शेतातील चाऱ्यावर भर 

पावसाचा फटका खरिपातील पिकांना बसला. परिणामी खाद्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची कमतरता निर्माण झाली. त्यामुळे बाजारपेठेतील तत्त्वानुसार मागणी जास्त आणि उत्पादन कमी यामुळे दरवाढ झाली आहे. परिणामी, खाद्यांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. त्याचा विचार करून काही शेतकऱ्यांनी खाद्याचा खुराक परवडत नसल्याचे सांगत जनावरांना शेतातील चारा देण्यासाठीची कार्यवाही सुरू केली आहे. 

दुष्काळाने हाेरपळलेले चंद्रहारांनी दहा हजारांत संत्र्याचे मिळविले पाच लाख

जनावरांच्या खाद्याच्या दरात वाढ झाली आहे. अगोदरच जनावरे सांभाळण्याचा खर्च डोईजड होत आहे. त्यात आणखी खाद्याची दरवाढ होत असल्याने जनावरे सांभाळणे जिकिरीचेच होत आहे. 
-केतन मोरे, शेतकरी, फडतरवाडी  

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase In The Price Of Animal Feed Satara News