Independence day : आरफळच्या विद्यार्थ्यांकडून सैनिकांना पत्रे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

indian-army-soldier

Independence day : आरफळच्या विद्यार्थ्यांकडून सैनिकांना पत्रे

नागठाणे - भारतीय सैनिक म्हणजे देशाचा अभिमान. या सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना सातारा तालुक्यातील आरफळ येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी त्यांना पत्रे लिहिली आहेत. सैनिकांविषयीच्या भावनांनी शब्दबद्ध झालेली ही पत्रे सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरली आहेत.

सध्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त विविध उपक्रम, कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. आरफळ येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळाही त्यात अग्रेसर आहे. शाळेने ‘हर घर तिरंगा’ जनजागृती फेरी, चित्रकला, वक्तृत्व, निबंध स्पर्धा आदी उपक्रमांत ठसा उमटविला आहे. त्यापुढे जात शाळेतील विद्यार्थ्यांनी जवानांना पाठवलेली पत्रे ही पालक, ग्रामस्थांसाठी कौतुकाचा विषय ठरली आहेत. देशभक्ती, राष्ट्राभिमान, सैनिकांविषयी असणारी अभिमानाची भावना, त्यांच्याविषयीची वाटणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे मुख्याध्यापिका स्मिता रांजणे यांनी नमूद केले.

सुबक, सुंदर हस्ताक्षरातून, भावभावनांनी उलगडत जाणारी ही पत्रे सैनिकांना पाठविण्यात आली आहेत. या आगळ्या उपक्रमासाठी मुख्याध्यापिका स्मिता रांजणे, वैशाली पवार यांचे मार्गदर्शन लाभले. गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, विस्तार अधिकारी जयश्री गुरव, केंद्रप्रमुख सुरेश भुरकुंडे तसेच शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

वैविध्यपूर्ण उपक्रम

आरफळ शाळेने वैविध्यपूर्ण उपक्रमांत भरीव कामगिरी बजावली आहे. अलीकडच्या काळात सुमारे दोन लाख रुपयांचा शैक्षणिक उठाव केला आहे. शाळेच्या पटसंख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. येथील आकर्षक वर्गखोल्या लक्षवेधक ठरत आहेत. विविध स्पर्धा परीक्षांतून शाळेचे विद्यार्थी चमकले आहेत.