महाबळेश्‍वरात पहिल्यांदाच दिसले पांढऱ्या रंगाचे शेकरू

अभिजीत खूरासणे
Sunday, 17 January 2021

महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या येथील विश्रामगृहातदेखील अशाच प्रकारचे एक शेकरू पाहावयास मिळाले होते. इंग्रजीमध्ये शेकरूस "इंडियन जायंट स्क्विरल' नावाने संबोधले जाते.

महाबळेश्वर ः येथील तहसीलदार कार्यालयाच्या शेजारी भूमिअभिलेख कार्यालयाच्या बाहेर असणाऱ्या नरक्‍या जातीच्या झाडाचे फळे खाताना स्थानिक नागरिकांना पांढऱ्या रंगाचे असलेली शेकरू (खार) प्रथमच या भागात दिसले. महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू अर्थातच शेकरा (Indian Giant Squirrel) या नावाने परिचित असलेली "खार' म्हटलं, की इटुकली पिटुकली, गोंडस झुपकेदार शेपूट इकडे तिकडे उडवत तुरुतुरू पळणारा प्राणी आपल्या नजरे समोर येतो; पण शेकरू मात्र खारीच्या या वर्णनाच्या अगदी उलट आहे, असे म्हणू शकतो.

शेपटीसकट साधारण तीन ते साडेतीन फूट लांबीची ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. तशी खार ही साधारणपणे तपकिरी रंगाची आढळते; परंतु महाबळेश्वर (Mahableshwar) येथील तहसीलदार कार्यालयानजीक नरक्‍याच्या झाडावर संपूर्ण पांढऱ्या रंगाचे दुर्मिळ शेकरू शुक्रवारी (ता. 15) सकाळी पाहावयास मिळाले.

शरद पवारांचे 'आत्मचरित्र' हेच कृषीनिती म्हणून लागू केले, तरी देशातील शेतकऱ्यांचा प्रश्न बऱ्यापैकी सुटेल

शेकरूंची पाठ तपकिरी, पिवळसर- पांढरा गळा, छाती, पोट, तोंडावर रुबाबदार लांब मिशा, लांब सुळ्यांसारखे दात, पायाला टोकदार वाकडी नखे असतात. मात्र या पांढऱ्या रंगाच्या शेकरूचे डोळे गुलाबीसर, तर त्याचे संपूर्ण शरीर पांढरे असल्याचे दिसून आले. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या येथील विश्रामगृहातदेखील अशाच प्रकारचे एक शेकरू पाहावयास मिळाले होते. इंग्रजी मध्ये शेकरूस "इंडियन जायंट स्क्विरल' नावाने संबोधले जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Giant Squirrel Seen In Mahableshwar Satara Marathi News