सातारा : महागाईची होरपळ

कोरोना, लॉकडाउन व इतर कारणांमुळे बाजारपेठेत झालेली दराची फुग अजूनही कायम
Inflation
InflationSakal

सातारा : कोरोना, लॉकडाउन व इतर कारणांमुळे बाजारपेठेत झालेली दराची फुग अजूनही कायम आहे. आंतरराष्‍ट्रीय घडामोडी आणि त्‍यामुळे उमटणाऱ्या पडसादाच्‍या नावाखाली दराची ही फुग अलीकडच्‍या काही दिवसांत पुन्‍हा एकदा वाढीस लागली आहे. उत्‍पन्न आणि खर्चाचा ताळमेळ घालताना अल्‍प, अत्‍यल्‍प उत्‍पन्न गटातील सातारकरांची कोंडी होत आहे. दिवसाला आवक आठ आण्‍याची आणि जावक रुपयाची असल्‍याने सांगा जगायचं कसं... असा सवाल करत सर्वसामान्‍य ‘अच्‍छे दिन’कडे नजरा लावून बसला आहे.

वाढलेली महागाई, पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसच्‍या दरात होणारी रोजची वाढ व इतर कारणास्‍तव रान पेटवून २०१४ मध्‍ये ‘अच्‍छे दिन’ची स्‍वप्‍ने दाखवत भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळवली. त्यानंतरच्‍या काळात केंद्राने सर्वसामान्‍यांसाठी राबविलेल्‍या योजनांची परिणामकता केवळ कागदोपत्रीच असल्‍याचे अनेक अहवालातून समोर आले. विविध योजना व इतर घोषणांच्‍या गोंधळामुळे हरखून गेलेल्‍या सर्वसामान्‍यांच्‍या खिशाला नंतरच्‍या काळात विविध कारणांस्‍तव कात्री लागत गेली.

तांत्रिक, अतांत्रिक कारणास्‍तव वाढणाऱ्या महागाईची झळ वाढत असतानाच भारतात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर पुकारलेल्‍या लॉकडाउनमुळे संपूर्ण जनजीवन तीन महिने घर बंद होते. संसर्ग कमी झाल्यानंतर काही अंशी व्‍यवहार सुरळीत झाले. मात्र, वाहतूक व्‍यवस्‍था विस्‍कळित झाल्‍याने जीवनाश्‍‍यक वस्‍तूंचे दर वाढीस लागले. या काळात शेतमालासह डाळी व इतर खाद्यपदार्थांचे दर प्रचंड वाढले. तुटवडा आहे, माल उपलब्‍ध होत नाही, पुन्‍हा लॉकडाउनची शक्‍यता आहे, या कारणास्‍तव वाढलेले दर अजूनही कायमच आहेत. सर्वसामान्‍यांचा खिसा अलीकडच्‍या महागाईमुळे पुन्‍हा रिकामा होत आहे. पेट्रोल-डिझेलसह घरगुती, व्‍यावसायिक गॅसचे वाढलेल्या दरामुळे महागाई वाढत असून त्‍याचा फटका जिल्ह्यातील अल्‍प, अत्‍यल्‍प उत्‍पन्न गटातील कुटुंबांना बसत आहे.

साताऱ्यातील अर्थ, व्‍यावसायिक, रोजगारनिर्मितीवर प्रचंड मर्यादा आहेत. सातारा एमआयडीसीमधील मोजक्‍याच रोजगारक्षम कंपन्‍या, तेथील रोजगार आणि वेतनाचा विचार केला तर साताऱ्याचे दरडोई उत्‍पन्न नगण्‍य असल्‍याचे दिसून येते. या नगण्‍य दरडोई उत्‍पन्नाच्‍या आधारे जगण्‍याची लढाई लढणारा सातारकर वाढलेल्‍या महागाईमुळे बेजार झाला आहे. हा बेजार सातारकर ‘अच्‍छे दिन’कडे नजरा लावून हताशपणे ‘सांगा जगायचं कसं’, असा सवाल उपस्‍थित करत आहे.

भाजीपाल्याचे दर आवाक्‍यात

लॉकडाउन व नंतरच्‍या काळात भाजीपाल्‍याच्‍या दरात वाढ झाली होती. कधी नव्‍हे तेवढा दर देशी गवार, कांदा, हिरवी मिरची व इतर शेतीपिकांना आला होता. मध्‍यंतरीच्‍या काळात मेथी व इतर पालेभाज्‍यांनी सलग काही दिवस ३० रुपयांच्‍या घरात ठाण मांडले होते. हे दर आता ओसरत चालले असून आज मंडईत बहुतांश शेतमालांचे दर ३० रुपये प्रति किलोच्‍या आत असले तरी गवारीने १२० चा दर सोडला नव्हता.

वाहनचालक-मालकांना फटका

पेट्रोल वाढीचा सर्वाधिक फटका रिक्षाचालकांना बसत असून दररोज वाढणाऱ्या दरानुसार त्‍यांना वाहतुकीच्‍या दरात बदल करावे लागत आहेत. ठराविक अंतराच्‍या प्रवासासाठीच्‍या दरात रोज बदल होत असल्‍याने रिक्षा व्‍यावसायिक आणि प्रवाशांच्‍यात दररोज खडाखडी होत आहे. या खडाखडीचा सामना करत पेट्रोलवर होणारा खर्च, घसारा व इतर बाबींचा विचार करत संसार हाकणाऱ्या जीप, रिक्षा चालकांचा संसार अडणीत येत चालला आहे.

दळणाचे दरही महागले

विजेचे वाढलेले दर, लागणाऱ्या सुट्या भागांच्‍या दरात झालेली वाढ, व्‍यवस्‍थापनावरील खर्च वाढल्‍याने शहरातील सर्वच गिरणी चालकांनी दळणाच्‍या दरात प्रति किलो एक रुपयाने वाढ करण्‍याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्‍या एक मे पासून करण्‍याचा गिरणी चालकांनी ठरवले आहे. दळणाच्‍या दराबरोबरच सर्वसामान्‍यांच्‍या पोटाला ऐनवेळी आधार देणारा वडापाव तेल, गॅस, बेसन पीठाच्‍या दरातील वाढीमुळे महागला आहे.

असंघटित कामगार गोत्‍यात

वाहतुकीचे दर वाढल्‍याने बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्‍याच्‍या दरात सुमारे २० ते ३० टक्के वाढ झाली आहे. वाढलेल्‍या दरामुळे बांधकाम व्‍यावसायिकांचा ताळेबंद बिघडत चालला आहे. घेतलेले काम अंगावर पडण्‍याच्‍या भीतीने अनेकांनी साहित्‍याचे दर कमी होईपर्यंत बांधकामे बंद ठेवली आहेत. या निर्णयाचा फटका बांधकाम क्षेत्रातील गवंडी, बिगाऱ्यांना बसत असून आठवड्यातून शोधून त्‍यांना तीन दिवसांचे कामही उपलब्‍ध होत नाही.

बचतीची सवय मोडली

येणारे उत्‍पन्न आणि होणारा खर्च याचा ताळमेळ बसत नसल्‍याने शिलकीत पैसे टाकण्‍याची अनेकांची सवय मोडली आहे. अनेकांची बँका, पतसंस्‍थेतील खाती रोकडअभावी रिकामी आहेत. कमी काय पडत नाय अन्‌ हातात काय उरत नाय, असे म्‍हणत अनेक जण हसत-हसत महागाईमुळे बचतीची सवयच मोडल्‍याचे सांगतात.

किराणा मालाचे दर नेमके कोण वाढवतंय?

किराणा मालाच्‍या दरातही दररोज वाढ होत असून त्‍याबाबत विचारणा केली असता, दुकानदार ग्राहकांना ‘काय करणार आम्‍ही... वरूनच दर वाढून आलेत’, असे उत्तर देतात. या उत्तरामुळे नेमकं असं वर कोण बसलंय आणि कोण दर वाढवतंय, या विचारचक्रात सर्वसामान्‍य दररोज अडकून पडत असून नेहमीच्‍या ठिकाणी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना जुन्‍यातील खरेदी असल्‍याने ‘तुम्‍हाला जुनाच दर लावलाय, नवीन माल वाढून आलाय’, असे सांगण्‍यात दुकानदार धन्‍यता मानत आहेत.

आवक आठ आण्‍याची... जावक रुपया!

पगाराचा दिवस आला की महिन्याचे बजेट कसे भागवायचे, याची करावी लागत असलेली कसरत नकोनकोशी वाटणारी आहे. महिन्‍याच्‍या पंधरा तारखेनंतर सर्वसामान्‍य नागरिकांना कुटुंबाचा खर्च भागविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाढत्या महागाईमुळे बचतीबरोबरच सर्वच खर्चांना कात्री लावावी लागत आहे. जेमतेम बजेटमध्ये महिना भागवण्याचे आव्‍हान सर्वसामान्यांबरोबरच सर्वच आर्थिक घटकातील नागरिकांना आहे. कोरोनाचे संकट आटोक्‍यात आल्‍यानंतर सर्वसामान्‍य व मध्यमवर्गीयांचे आर्थिक चक्र गतिमान होत असताना वाढत्‍या इंधनदर व महागाईमुळे या चाकाला पुन्‍हा ब्रेक लागत आहे.

कोरोनाच्या संकटातही प्रत्येकाला विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क व दैनंदिन गरजा भागवणे क्रमप्राप्त होते. कोरोनाच्या काळात सर्वत्र आर्थिक स्थिती खालावलेली असतानाच कोरोनानंतर इंधनाचे दर व महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य व मध्यमवर्गीय वर्गातील नागरिकांचे हाल होत आहेत. त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंचे दरही भडकल्याने उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ घालताना कसरत होत आहे.

- विजय ननावरे, व्यावसायिक

इंधनाबरोबरच वाढत्या पालेभाज्यांच्या दरामुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे. आधीच कोरोनामुळे आर्थिक फटका बसल्याने नागरिक मेटाकुटीला आलेले आहेत. सद्य:स्थितीत भाज्यांचे दर पाहता आत्तापर्यंतची सर्वाधिक महागाई असल्याचे दिसून येते. याबाबत केंद्र सरकार व राज्य सरकारने इंधनाचे दर व जीवनावश्यक वस्तूंची महागाई कमी करण्याबाबत पावले उचलून नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे.

- मेघा मोरे, गृहिणी

इंधन व भाजीपाला दरवाढीचा फटका राजकीय पुढाऱ्यांना न बसता सर्वसामान्‍य नागरिकांना बसत आहे. याचबरोबर जीवनावश्‍यक वस्तूंचे दरही आवाक्‍यात न राहिल्‍याने जनता मेटाकुटीला आलेली आहे. सर्वच वर्गातील लोकांना पेट्रोल व डिझेल दरवाढीची झळ बसत आहे. याबाबत केंद्र सरकार व राज्‍य सरकारने महागाई कमी करण्याबाबत ठोस निर्णय घेण्याची आवश्‍यकता आहे.

- गणेश जगताप, नोकरदार

गेल्या काही दिवसांपासून खतांचे दर भडकल्याने शेतीत भांडवल गुंतवताना शेतकरी मेटाकुटीला आला आहे. भाजीपाला व रोज लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू महागल्याने सर्वसामान्य जनता महागाईत होरपळून निघालेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांना घर चालवताना कसरत करावी लागत आहे.

- आकाश गवळी, विद्यार्थी

मागील काही दिवसांत पेट्रोल १२० रुपये लिटरच्या पुढे व डिझेल १०२ रुपये लिटरवर गेले आहे. जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दरही कमी होत नाहीत.

या महागाईचा फटका व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे.

सोमनाथ देशमुख, व्यावसायिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com