
Satara Crime : गुन्ह्यातील पिस्तुलांचा तपास अर्धवटच
कऱ्हाड : पोलिसांचा कमी झालेला लोकसंपर्क, खबऱ्यांचे तुटलेले जाळे अन् नियंत्रणाबाहेरचे गुन्हेगारी क्षेत्र, असा आव्हान असतानाच वेगवेगळ्या गुन्ह्यात जप्त झालेल्या पिस्तूल तपासात ढिलाई दिसत आहे. दहा वर्षांत सुमारे ४५ पिस्तूल जप्त केल्या असल्या तरी त्यातील एकाही गुन्ह्याचा तपास शेवटापर्यंत गेला नसल्याचे दिसून येते.
तस्करीला आणलेल्या पिस्तूल पोलिस जप्त होत आहेत. त्याचे गुन्हे ही दाखल होत आहेत. मात्र, त्याचा तपासही अर्धवट होत आहे. ती पिस्तूल पुरवणारा कोण? याचा तपास होताना दिसत नाही. त्यामुळे पोलिसांना या प्रकरणांचा तपास मुळापर्यंत करता आलेला नाही.
संशयिताने पिस्तूल कुठून आणली? तो कोठे विकणार होता? त्याला पिस्तूल पोच करणारा कोण? या रॅकेटच्या तपासात पोलिस हात घालूच शकत नाहीत, अशी स्थिती आहे. त्यामुळे तपास कागदावरच राहिला.
शहरात काही स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांकडे असलेली पिस्तुलांची चौकशी होत नाही. पिस्तूल सापडली, की तडजोडी होताना दिसते, त्या टाळण्याची गरज आहे. विशिष्ट गल्ल्यांत अवैध पिस्तूल आहेत. किरकोळ वाद झाला, तरी त्या पिस्तूल बाहेर निघतात.
पोलिसांनी गुंडाच्या टोळ्यांकडून २००९ पासून जवळपास ४५ पिस्तूल जप्त केल्याची नोंद आहे. मात्र, त्याचा तपास रखडलेलाच दिसतो. काही तपास कागदोपत्री पूर्ण आहेत. त्यात गुंडाकडील जप्त पिस्तूल मृत गुंडाकडून आणल्याचे सांगून तपास फाइल बंद होतो.
तस्करीसाठी आलेल्या पिस्तुलाचाही तपास पोलिस करताना दिसत नाहीत. एकाही जप्त पिस्तूलचा तपास पोलिसांनी मुळापर्यंत केलेला नाही. महाराष्ट्र केसरी संजय पाटील, मयूर गोरे, सलीम शेख ऊर्फ सल्या चेप्या, बबलू माने ते पवन सोळवंडे खुनापर्यंत पिस्तूलचा झालेला वापर गांभीर्य वाढवणारा असला, तरी पोलिसांना त्याच्याशी काहीही देणे-घेणे नसल्यासारखी स्थिती आहे.
त्यातील तपासाचा आलेखही बरेच काही सांगून जातो. त्यामुळे परराज्यापर्यंत त्याचे कनेक्शन जात असल्याने पोलिसही हतबल दिसतात. पोलिस वरवरची कारवाई करत असल्याने दर दोन महिन्यांला पोलिस रेकॉर्डवरील संशयित पिस्तूल बाहेर काढतात. त्यांचा जास्त उपद्रव झाला, की पोलिसांची कारवाई होते, अशीच साखळीच तयार होत आहे. ती थांबले पाहिजे, यासाठी पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित असतानाही ती होताना दिसत नाही.
अशा हव्यात उपायायोजना
अवैध पिस्तूल शोधण्यासाठी ठराविक भागात कोंबिंग ऑपरेशन.
रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती
रात्रीसह दिवसाही पोलिस गस्त वाढवणे
रेकॉर्डवरील संशयितांचा गल्लीनिहाय माहिती ठेवणे
शहरालगतच्या उपनगरांतील हालचालींवर लक्ष