Satara News : दोन्ही राजेंच्या भेटीने शशिकांत शिंदे केंद्रस्थानी

जावळीचे राजकारण चर्चेत : राष्ट्रवादीच्या मेळाव्यानंतर हालचाली गतिमान
जावळीचे राजकारण चर्चेत : राष्ट्रवादीच्या मेळाव्यानंतर हालचाली गतिमान
जावळीचे राजकारण चर्चेत : राष्ट्रवादीच्या मेळाव्यानंतर हालचाली गतिमानsakal
Summary

जावळीचे राजकारण चर्चेत : राष्ट्रवादीच्या मेळाव्यानंतर हालचाली गतिमान

कास/सायगाव : जावळीच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचा झालेला मेळावा पाहता गेल्या पंधरा दिवसांत अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नुकतीच आमदार शशिकांत शिंदे व माथाडी नेते ऋषिकांत शिंदे यांच्या हुमगाव येथील निवासस्थानी एकापाठोपाठ भेट दिल्याने जावळीच्या राजकारणाची समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांची शशिकांत शिंदे यांची झालेली भेट महत्त्वपूर्ण मानली जाते. गेल्या दोन वर्षांत या दोन्ही नेत्यांत झालेला संघर्ष पाहता राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. जावळी- महाबळेश्वर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेल्या शशिकांत शिंदे यांचा मतदारसंघ पुनर्रचनेत जावळी- सातारा मतदारसंघ तयार झाला.

त्यानंतर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासाठी राष्ट्रवादीने हा मतदारसंघ सोडला. जावळीचे सुपुत्र असूनही शशिकांत शिंदे यांना कोरेगावमध्ये विस्थापित व्हावे लागले. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये गेले. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीतून दीपक पवारांनी लढत दिली. महाविकास आघाडीची सत्ता येऊन ही राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या बाबतीत सॉफ्ट कॉर्नर राहिला.

त्यानंतर आमदार शिंदे यांनी जावळीच्या राजकारणात लक्ष घालून राष्ट्रवादीला बळकटी देण्याचा केलेला प्रयत्नाने आमदार शिवेंद्रसिंहराजे दुखावले. त्यामुळे शिवेंद्रराजे व शशिकांत शिंदे यांच्यात संघर्षाला सुरुवात झाली. यात आमदार शिंदे यांच्या कोरेगावमधील झालेल्या पराभवास आमदार शिवेंद्रराजेंचा हात असल्याची चर्चा होती.

त्यानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे यांनी त्यांचे विश्वासू ज्ञानदेव रांजणे यांना उभे करून शिंदेंना आव्हान दिले. या निवडणुकीत राज्य पातळीवरील नेत्यांनी विनंती करूनही रांजणे यांनी शिवेंद्रराजेंचा आधार घेत माघार न घेता शशिकांत शिंदेंचा अवघ्या एका मताने पराभव केला.

आमदार शिंदे यांना हा पराभव जिव्हारी लागला. त्यानंतर पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका होतील, या शक्यतेने दोन्ही गटांकडून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मोठे शक्तिप्रदर्शन केले.

या घडामोडीत खासदार उदयनराजे हे मात्र, जावळीतील राजकारणात कधीच जास्त सक्रिय नव्हते. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जावळीतील वाढलेल्या भेटीने जावळीत काहीतरी राजकीय भूकंप घडण्याची शक्यता निर्माण होत आहे.

त्यातच शशिकांत शिंदे व खासदार उदयनराजे भोसले यांच्यात कधीही टोकाचे मतभेद, संघर्ष पाहायला मिळाला नाही, तरीही शशिकांत शिंदे सातारा नगरपालिका राष्ट्रवादी पक्षाकडून लढवण्याची विधाने करत असतात. लोकसभा निवडणुकीतील उदयनराजे यांच्या पराभवाचा मुद्दा सोडला तर उदयनराजे व शशिकांत शिंदे यांच्यात टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला नाही.

मात्र, गेल्या दोन वर्षांत शिवेंद्रसिंहराजे व आमदार शिंदे यांच्यात जावळीतील वर्चस्वावरून अधूनमधून खडाखडी होत असते. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले हेच टार्गेट असले, तरी त्यांच्यावर थेट नाव घेऊन टीका करण्याचे वक्त्यांनी टाळले. आमदार शिंदे हे या मेळाव्यात जास्त उत्साही दिसत होते.

मेळाव्याला झालेली गर्दी राष्ट्रवादीच्या पूर्ववैभवाची साक्ष देणारी ठरली होती, तरीही आमदार शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दीपक पवार, अमित कदम यांचा मनापासून मेळ झाला तरच शिवेंद्रसिंहराजे यांच्यासमोर आव्हान उभे करण्यात यश येणार आहे. मात्र, राजकारणाची दिशा कधी बदलेल? हे सांगता येत नाही.

दुरावा होणार कमी...

दोन दिवसांपूर्वी शिवेंद्रसिंहराजे काही कार्यक्रमानिमित्त हुमगावात गेले होते. त्या वेळी आमदार शिंदे यांना त्याबाबत समजताच त्यांनी शिवेंद्रराजेंना घरी नेऊन त्यांचे स्वागत केले. त्यातून दोघांतील दुरावा कमी होण्यास मदत होणार आहे. मात्र, भविष्यात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत निवडणुकांची समीकरणे बदलणार, हे नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com