झांजवडमध्ये मुंबईकरांचे जल्लोषी स्वागत, श्रमदानातून क्वारंटाइन सेंटर उभारणी

झांजवडमध्ये मुंबईकरांचे जल्लोषी स्वागत, श्रमदानातून क्वारंटाइन सेंटर उभारणी

भिलार (जि. सातारा) : मुंबईकर चाकरमान्यांची स्वतःच्या गावात येऊन होत असलेली होरपळ व मिळणाऱ्या वागणुकीला छेद देत सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या झांजवड (ता. महाबळेश्वर) येथील ग्रामस्थांनी मुंबईकरांचे जल्लोषी स्वागत केले असून, त्यांच्यासाठी श्रमदान आणि स्वखर्चातून संस्थात्मक क्वारंटाइन सेंटरची उभारणी केली आहे. त्यामुळे मुंबईकर आणि ग्रामस्थांमध्ये सलोखा, सामाजिक ऐक्‍य आणि आपुलकीची भावना रुजवल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, की दरवर्षी गावागावांत होणारे ग्रामदैवतांचे यात्रा उत्सव, होळी, गणपती उत्सव अशा अनेकविध कार्यक्रमांत मुंबईतील चाकरमान्यांचा सहभाग असतो. अगदी शेतीच्या कामात मोठी मदत असते. गावाच्या आणि समाजाच्या कोणत्याही महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग असतो. अशा वेळी ग्रामस्थ या मुंबईकरांची चातकासारखी वाट पाहतात. पण, आता याच मुंबईकर चाकरमान्यांना कोरोनाने पेचात टाकले आहे. गाव आणि मुंबईकर असा भेदभाव निर्माण केलाय. मुंबईकर येणार म्हटलं की आख्खं गाव ढवळून निघतंय. सर्व परवानग्या घेऊन आलेल्या मुंबईकरांना खबरदारी म्हणून गावाबाहेर शाळेत ठेवले जातंय. कधी कधी दोघांमध्ये वाद होताहेत. पण, या मुंबईकरांना मिळणारी वागणूक अक्षरशः काळीज पिळवटून टाकत आहे. या साऱ्या गोष्टींचा विचार करून प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या झांजवड या गावाने मात्र या मुंबईकरांचे "या गाव आपलेच असो, आम्ही आपल्या स्वागतास उत्सुक आहोत,' या भावनेने चाकमान्यांचे जल्लोषी स्वागत करून त्यांना सेवाही दिली आहे. 

सरपंच, पोलिस पाटील, समिती आणि ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन बैठक घेतली व लोकांमधील मुंबईकर, कोरोना, गावकरी आणि भीती यातील गैरसमज दूर केले आणि रात्रंदिवस मेहनत घेत श्रमदानातून संस्थात्मक क्वारंटाइन सेंटरची उभारणी केली. लागणारा खर्च गाववाल्यांनी स्वखर्चातून केला आहे. येणाऱ्या मुंबईकरांना कसलीही कमतरता भासणार नाही, याची दक्षता घेतली आहे. प्रारंभी शाळा आणि त्यानंतर मंदिर आणि त्यातूनही कमी पडल्याने शेवटी ग्रामस्थांनी आपली घरे मोकळी करून ते इतरत्र कुणाच्याही ओसरीवर राहून त्यांना घरे दिली आहेत. ग्रामस्थांनी उपलब्ध करून दिलेल्या सोयीने मुंबईकर भारावून गेले आहेत. या अनोख्या पाहुणचाराने एकमेकांमधील आपुलकी, प्रेम वृद्धिंगत होणार आहे. झांजवडकरांच्या या अनोख्या प्रेमाच्या आणि सामाजिक ऐक्‍याच्या उपक्रमाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. 



श्रमदानातून शौचालयांची निर्मिती... 

झांजवड ग्रामस्थांनी मुंबईकरांच्या स्वागतासाठी तयारी करताना श्रमदानातून सार्वजनिक दोन शौचालयांची निर्मिती एका रात्रीत श्रमदानातून उभारली आहे. यावरून ग्रामस्थांची एकी आणि मुंबईकरांविषयी आपुलकी दिसून येते. 


""आपल्या रक्ताच्या, जिवाभावाच्या माणसांसाठी कोरोनाच्या महाभयंकर अडचणीच्या प्रसंगात धावून जाणे आपले प्रथम कर्तव्य आहे. कोरोनाच्या भीतीने मुंबईकरांना दूर लोटून न देता प्रेमाची व आपुलकीची वागणूक देऊन त्यांच्या मनात माणुसकीचा ओलावा आम्ही गावकऱ्यांनी निर्माण केला आहे.'' 

-किशोर जाधव, सरपंच, झांजवड, ता. महाबळेश्वर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com