मर्जीतील अधिकाऱ्यांची दोन शाखांवर वर्दी!

सचिन शिंदे  | Friday, 30 October 2020

ना डीबीचे काम व्यवस्थित आहे ना वाहतूक शाखेला शिस्त आहे. हे दोन्ही विभाग नीट चालण्यासाठी दोन्ही विभागांत स्वंतत्र अधिकाऱ्यांची नेमणुकीची गरज आहे. पोलिस ठाण्यात अन्य दहा सक्षम अधिकारी असतानाही महत्त्वाच्या डीबी व वाहतूक शाखेवर मर्जीतील एकाच अधिकाऱ्याच्या वर्दीच्या गौडबंगालाची चर्चा सुरू आहे.

कऱ्हाड (सातारा) : सर्वसाधारणपणे एका अधिकाऱ्याकडे एकाच विभागाचा "चार्ज' असतो, तरच संबंधित अधिकारी त्या विभागाचा कारभार व्यवस्थित पाहू शकतो. कऱ्हाडसारख्या शहरात तरी विभागनिहाय स्वतंत्र अधिकाऱ्यांची नितांत गरज असतानाही शहर पोलिस ठाण्यात मात्र एकाच अधिकाऱ्याकडे डीबी आणि वाहतूक शाखेचा कारभार सोपविला आहे.

पोलिसांच्या दोन्ही शाखा मोठ्या असल्याने एकच अधिकारी त्यावर व्यवस्थित नियंत्रण ठेऊ शकत नाही, त्याची प्रचिती शहरात येऊ लागली आहे. ना डीबीचे काम व्यवस्थित आहे ना वाहतूक शाखेला शिस्त आहे. हे दोन्ही विभाग नीट चालण्यासाठी दोन्ही विभागांत स्वंतत्र अधिकाऱ्यांची नेमणुकीची गरज आहे. पोलिस ठाण्यात अन्य दहा सक्षम अधिकारी असतानाही महत्त्वाच्या डीबी व वाहतूक शाखेवर मर्जीतील एकाच अधिकाऱ्याच्या वर्दीच्या गौडबंगालाची चर्चा सुरू आहे.
 
शहर पोलिस ठाण्याची वाढती व्याप्ती, वाहतूक कोंडीची स्थिती लक्षात घेऊन काही वर्षांपूर्वी पोलिस अधीक्षकांच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र वाहतूक शाखेचा कारभार सुरू आहे. तेथील अधिकाऱ्याची पोलिस अधीक्षक थेट नेमणूक करतात. सध्या त्या शाखेत एका अधिकाऱ्यासह 43 कर्मचारी आहेत. शहरासह 21 गावांतील वाहतूक नियंत्रणाचा ताण त्यांच्यावर आहे. शहरात एक लाखाहून अधिक वाहनांसह तेवढीच शहरात रोज वाहने येतात हे सारे लक्षात घेऊन वाहतूक शाखा देण्यात आली. कोरोना, लॉकडाउनच्या काळात या शाखेवर सध्या थोडा ताण कमी आहे. मात्र, तो आता हळूहळू वाढतो आहे. 

लॉकडाउनचा कालावधी संपताना येथील वाहतूक शाखेचे फौजदार विकास बडवे यांची विनंती बदली झाली. श्री. बडवे यांची 16 जुलैच्या दरम्यान बदली झाली. त्यानंतर त्यांच्या जागी सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे यांची तात्पुरती नेमणूक पोलिस अधीक्षकांनी केली. मात्र, त्यांच्याकडे डीबी शाखेचा कार्यभार असताना वाहतूक शाखा देण्यात आल्याने त्यावेळी जोरदार चर्चा झाली. डीबीचा कार्यभार येथे मोठा आहे. सध्या तेथे 15 कर्मचारी आहे. त्यांच्यावरही ताण असताना त्यांच्या अधिकाऱ्याला वाहतूक विभागाचाही चार्च दिल्याने डीबीचा एकसूत्रीपणा गायब झाला आहे. 

आता डीबीचा कारभार सुरळीत आहे, ना वाहतूक शाखेचा, अशी स्थिती आहे. त्यामुळे दोन्ही शाखेला स्वतंत्र अधिकारी देण्याची गरज आहे. असे असताना अन्य अधिकाऱ्यांचा काही विचार झालेला नाही, त्याचे आश्‍चर्य आहे. पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील आहेत. त्यांच्याशिवाय एक पोलिस निरीक्षक, तीन सहायक पोलिस निरीक्षक व पाच फौजदार असा अधिकाऱ्यांचा फौजफाटा असतानाही त्यापैकी कोणाचीच नेमणूक न करता थेट डीबीचा कार्यभार असलेल्या अधिकाऱ्याच्या नेमणुकीचे गौडबंगाल तरी काय, अशी पोलिस खात्यात चर्चा आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले