कऱ्हाड : मराठा समाज आंदोलनावर ठाम

सचिन शिंदे
Monday, 14 September 2020

राज्यातील 165 मराठा समाजातील आमदारांना पत्रे पाठवून राज्य शासनामार्फतही आवश्‍यक ती कार्यवाही करण्यासाठी आग्रह धरण्यात येणार आहे.
 

कऱ्हाड : मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर कऱ्हाड तालुका मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्याचा निर्धार आज झालेल्या बैठकीत करण्यात आला. दरम्यान, आंदोलनाची रूपरेषा मंगळवारी (ता. 15) होणाऱ्या बैठकीत ठरणार आहे.
 
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा समाजबांधवांची तातडीची बैठक झाली. त्यामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या या भूमिकेबद्दल निषेध नोंदविण्यात आला. केंद्र व राज्य शासनाने आवश्‍यक त्या उपाययोजना करून मराठा आरक्षण दिले पाहिजे, यावर सर्वानुमते एकमत झाले. रस्त्यावर उतरल्याशिवाय सत्ताधाऱ्यांना जाग येणार नाही. सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करून मराठा आरक्षणाचा नव्याने अध्यादेश काढावा, अशीही चर्चा झाली.

साताऱ्यात मराठा क्रांती मोर्चाची झाली गाेपनीय बैठक; आंदोलनाचा पवित्रा 

खासदारांना मेल, आमदारांना पत्र 

संसदेचे अधिवेशन उद्यापासून (सोमवार) सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदारांनी संसदेत मराठा आरक्षणासाठी आवाज उठवावा म्हणून कऱ्हाड तालुका मराठा समाजाच्या वतीने राज्यातील सर्व मराठा खासदारांना मेल करून विनंती करण्यात आली आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांना पहिला मेल करून त्याची सुरवात करण्यात आली. राज्यातील 165 मराठा समाजातील आमदारांना पत्रे पाठवून राज्य शासनामार्फतही आवश्‍यक ती कार्यवाही करण्यासाठी आग्रह धरण्यात येणार आहे.

कोरोनाग्रस्त अंत्यविधीसाठी कऱ्हाडला युवकांचा पुढाकार

संपादन : सिद्धार्थ लाटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karad Maratha Kranti Morcha Demands Reservation Satara News