कार्यक्रमांना निमंत्रण दिले जात नसल्यावरून सभापती, सदस्यांचा संताप; अधिकाऱ्यांची कानउघडणी

हेमंत पवार | Sunday, 7 February 2021

वीज कंपनीच्या आढाव्यावेळी 356 शेतकऱ्यांना नवीन वीज कनेक्‍शन देण्यात आल्याचे सांगितले.

कऱ्हाड : पंचायत समितीच्या विविध खात्यांमार्फत घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांना पंचायत समिती सदस्यांना, पदाधिकाऱ्यांना अनेकदा बोलवलच जात नाही. बोलवलच तर तासभर अगोदर कार्यक्रमाला या, असे सांगतात. त्यानंतर काही वेळाने आता कार्यक्रम झाला, नाही आला तरी चालेल, असे अधिकारी सांगतात. हे बरोबर आहे का? अशी विचारणा खुद्द पंचायत समिती सभापती, सदस्यांनीच सभागृहात करून अधिकाऱ्यांना मासिक सभेत जाब विचारला.

सभापती प्रणव ताटे अध्यक्षस्थानी होते. पंचायत समितीसंदर्भात बैठकांना आणि पंचायत समितीच्या विविध विभागांच्या कार्यक्रमांना सदस्यांना बोलवलेच जात नाही, असा आरोप सभापती ताटे, सदस्या फरिदा इनामादार, अर्चना गायकवाड, सदस्य रमेश चव्हाण, ऍड. शरद पोळ यांनी उपस्थित केला. सभापती ताटे यांनी संबंधित बैठकांना सदस्यांना का सांगितले जात नाही, अशी विचारणा केली. सदस्या गायकवाड यांनी काही अधिकारी बैठकीच्या अगोदर एक तास फोन करतात. त्यानंतर बैठक संपली आहे, नाही आले तरी चालेल असे सांगतात, हे बरोबर आहे का? अशा विचारणा केली. 

चुलीवरचे जेवण! सह्याद्रीत आंदाेलनाचा इशारा

Advertising
Advertising

इनामदार यांनीही बैठकांना, कार्यक्रमांना बोलवले जात नाही हे तीन वर्षे आम्ही सांगत आहोत, तरीही सुधारणा होत नाही, मग त्याचा उपयोग काय? असे उद्विग्नपणे सांगितले. चव्हाण, ऍड. पोळ यांनीही नाराजी व्यक्त केली. सभापती ताटे यांनी यापुढे सुधारणा दिसली पाहिजे, असे खडसावले. उपसभापती रमेश देशमुख यांनी गावातून जलजीवन मिशन अंतर्गत प्रस्तावच येत नसतील तर ग्रामसेवक काय करताहेत? अशी विचारणा केली. गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांनी पाणीपुरवठा विभागाने ग्रामसेवकांना माहिती देऊन प्रस्ताव तयार करून घेतले पाहिजेत, अशा सूचना केल्या. उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने डॉ. दीपक कुऱ्हाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी कोरोना लसीकरणाची माहिती दिली. रोजगार हमी योजनेतून झालेल्या कामांची बिले मिळत नसल्याचे उपसभापती देशमुख यांनी निदर्शनास आणून दिले. स्ट्रीट लाईटसाठी जिल्हा नियोजनमधून पैसे मिळावे, अशी मागणी देवराज पाटील यांनी केली. तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला यांच्यासह बांधकाम, शिक्षण, लघुपाटबंधारे, ग्रामपंचायतसह अन्य विभागांच्या अधिकाऱ्यांनी आढावा दिला. उपसभापती देशमुख यांनी आभार मानले. 

आता जे काही घडेल, ते सातारा - सांगलीतील अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतरच!

शेतकऱ्यांच्या माहितीसाठी बैठका 

वीज कंपनीच्या आढाव्यावेळी 356 शेतकऱ्यांना नवीन वीज कनेक्‍शन देण्यात आल्याचे सांगितले. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांची वीज थकबाकी 132 कोटी आहे. त्यांना वीजबिल भरण्यामध्ये सूट देण्यात आली. त्यासाठी गावोगावी बैठका घेण्यात येत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. 

पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात सिंधुदुर्गचे प्रवासी ठार

शरद पवारांशी चर्चेनंतरच व्यवस्थापनाने आम्हांस प्रतापगड साेपविलाचा संचालक मंडळास पडला विसर!

केंद्रातील मंत्री बहिरे, माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आक्रमक; साताऱ्यात आंदाेलकांची पाेलिसांकडून उचलबांगडी