Video : शिवडेतील दरोड्याप्रकरणी उत्तर प्रदेशचे पाचजण गजाआड; युवतीही ताब्यात

सचिन शिंदे | Wednesday, 16 September 2020

शिवडे येथील एस. के. पेट्रोल पंपावर मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या सहा जणांनी सशस्त्र दरोडा टाकत बंदुकीचा धाक दाखवून दोघांना मारहाण करत 38 हजारांची लूट केली होती. ही घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली होती.

कऱ्हाड (जि. सातारा) : पुणे-बंगळूर महामार्गावरील शिवडे येथील पेट्रोल पंपावर पडलेल्या सशस्त्र दरोड्यातील सहाही संशयितांना कऱ्हाड शहर पोलिसांनी अवघ्या 48 तासांत गजाआड केले. त्यातील एक जण स्थानिक असून, तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील संशयित आहे. अन्य पाच जण उत्तर प्रदेशातील आहेत. दुपारी चारच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून सर्वांना ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत एका युवतीलाही ताब्यात घेतले आहे. 

शिवडे येथील एस. के. पेट्रोल पंपावर मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या सहा जणांनी सशस्त्र दरोडा टाकत बंदुकीचा धाक दाखवून दोघांना मारहाण करत 38 हजारांची लूट केली होती. ही घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली होती. शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरक्षक बी. आर. पाटील यांना दरोड्यातील एकाची ओळख खबऱ्याने पटवली. त्या संशयिताचे नाव विकी सोनवणे (रा. नरवणे, ता. माण) असे होते. त्याबाबत पोलिसांनी खात्री केली. त्यानंतर त्याच्यावर वॉच ठेवण्यात आला. विद्यानगर भागात तो राहात असल्याची माहिती पुढे आली. पोलिसांनी त्याला चौकशीला ताब्यात घेण्याचा प्रयत्नही केला. मात्र, तो सापडला नाही. 

गुन्ह्यांसंदर्भातले खटले न भरल्याने वनपाल निलंबीत

होली फॅमिली स्कूलच्या मागील बाजूला असलेल्या कॉलनीतही तो राहत आहे, असेही स्पष्ट झाले होते. पोलिसांनी त्या परिसरातही वॉच ठेऊन दुपारी छापा टाकला. त्या वेळी तेथे विकी ऊर्फ मन्या नंदकुमार बनसोडे (वय 27, सध्या रा. वैभव कॉलनी, विद्यानगर, कऱ्हाड), अनुभव सुरेंद्र मिश्रा (19, मूळ रा. दिलेरगंज, जि. प्रतापगड- उत्तर प्रदेश), उमजा सुमितसिंग सिंग (26) व सुमितसिंग मालसिंग सिंग (36, दोघे मूळ रा. धनकमई, जि. फतेपूर) वीरप्रतापसिंग महादेव सिंग (25, मूळ रा. तंजपूर, जि. फतेपूर), शुभम मनोज सिंग (18, मूळ रा. आखरी, जि. फतेपूर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

विद्यालयाच्या मैदानावरील बड्डे पडला महागात; 20 युवकांवर गुन्हा दाखल 

पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बी. आर. पाटील, सहायक पोलिस निरीक्षक अमित बाबर, राहुल वरोटे, फौजदार शहाजी पाटील, हवालदार संजय जाधव, आनंदा जाधव, मारुती लाटणे, विनोद माने, प्रफुल्ल गाडे, तानाजी शिंदे, संग्राम पाटील, अनिल चव्हाण, रवींद्र देशमुख व सागर भोसले यांनी कारवाईत भाग घेतला. 

काँग्रेस आमदारांच्या उत्तराने उलट-सुलट चर्चांना पूर्णविराम 

कऱ्हाड शहर पोलिसांना रेकॉर्डवरील संशयित हा दरोड्यात सामील असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे पोलिसांनी पाळत ठेऊन विद्यानगर येथे लपून बसलेल्या संशयितांना सापळा रचून ताब्यात घेतले. संशयितांनी आणखी कुठे गुन्हे केले आहेत का, याबाबतही चौकशी केली जाणार आहे. 

- तेजस्वी सातपुते, पोलिस अधीक्षक, सातारा 

संपादन : बाळकृष्ण मधाळे