भाजपविरोधी योग्य वेळी मोट बांधणार - शरद पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad pawar

भाजपच्या विरोधात देश पातळीवर राष्ट्रीय पक्षांची आघाडी आहे. मात्र, त्यांच्यात अद्याप कोणत्याही हालचाली नाहीत. प्रत्येकात सुसंवाद मात्र निश्चित आहे.

Sharad Pawar : भाजपविरोधी योग्य वेळी मोट बांधणार

कऱ्हाड - भाजपच्या विरोधात देश पातळीवर राष्ट्रीय पक्षांची आघाडी आहे. मात्र, त्यांच्यात अद्याप कोणत्याही हालचाली नाहीत. प्रत्येकात सुसंवाद मात्र निश्चित आहे. त्यामुळे दिल्ल्लीचे नेते मनीष सिसोदिया यांच्यावर झालेल्या कारवाईच्या विरोधात एकत्रित पत्र देण्यात आले आहे. योग्य वेळ येताच भाजप विरोधात मोट बांधणी करण्यासंबंधाने हालचालीही होतील, असे मत ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. सगाम महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमानंतर श्री. पवार यांनी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला.

केंद्र सरकारकडून केंद्रीय यंत्रणेचा होत असलेल्या गैरवापराबाबत ज्येष्ठ नेते पवार म्हणाले, ‘केंद्राच्या यंत्रणेने अलीकडच्या काळात अनेकांवर कारवाई केली आहे. मात्र, त्या कारवाईमध्ये तफावत दिसते. केंद्राच्या एजन्सीकडून होणारी कारवाई वादातीत आहे. त्यापैकी दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्यावर झालेली कारवाई अधिक महत्त्वाची आहे. देश व देशाच्या बाहेर केजरीवाल सरकारच्या कामाचे कौतुक होत आहे. असे असताना त्यांच्या मंत्र्यांवर होणारी कारवाई चुकीची वाटते. त्यांच्यावर पडलेली केस चुकीच्या आधारावर आहे. जवळपास आठ राज्यातील महत्त्वाच्या लोकांवर कारवाई झाली. अशाच प्रकारची कारवाई करून त्यांच्यावर वचक निर्माण करण्याचे काम झाले. अशी सगळी एकत्रित माहिती त्या पत्रात लिहिली आहे. त्यामुळे या सगळ्याच्या फेरविचार करावा, अशी विनंतीही या पत्रात केली आहे.’’

औरंगाबादच्या नामांतराबाबत ते म्हणाले, ‘औरंगजेबाचा फोटो धरणे आंदोलनात होता त्याबाबत एमआयएमच्या नेत्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्या खोलात जाण्यास अर्थ नाही. आतापर्यंत खरा औरंगजेब पाहिला आहे का? हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. जो फोटो नाचविला गेला. तो त्याचाच होता कशावरून असे अनेक फाटे फुटू शकतात. त्यामुळे त्याच्या खोलात न जाणे बरे.

कांदाप्रश्‍नी दिलासा द्यावा

नाफेडने मध्यस्थी करून कांदा खरेदी करून कांदाउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे, असे मत शरद पवार यांनी कांदा प्रश्‍नावर बोलताना व्यक्त केले.

नियुक्ती चुकीची

संजय राऊत यांच्यावरील हक्कभंगाबाबत शरद पवार म्हणाले, ‘हक्कभंग समिती नेमा अशी मागणी करण्याचा अधिकार त्यांना आहे. मात्र, समिती नेमा अशी मागणी करणाऱ्यांचीच हक्कभंग समितीत नियुक्ती केली, हे चुकीचे आहे. याचा अर्थ असा होतो, की तक्रार करणाऱ्या व्यक्तीलाच न्यायाधीश केल्यासारखा हा प्रकार झाला.’